महाराष्ट्र

maharashtra

Anil Deshmukh : महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादीच मोठा भाऊ - अनिल देशमुख

By

Published : May 22, 2023, 10:54 PM IST

Anil Deshmukh

राज्यात सध्या राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचं मोठा भाऊ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच तपास यंत्रणा राष्ट्रवादीला टार्गेट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सातारा : राज्यात आधी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यावेळी ते मोठे भाऊ होते. परंतु, सध्या राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकी आधी तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

'तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु' : सोमवारी एका खासगी दौऱ्यानिमित्त कराडला आलेले अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'देशात विविध शासकीय तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला आहे. राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे. मला खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले. मला आणि संजय राऊत यांना तुरूंगात टाकून आमचा छळ केला. मध्यंतरी ते हसन मुश्रीफ यांच्या मागे लागले होते. आता जयंत पाटील यांना त्रास द्यायला सुरूवात केली आहे. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण अतिशय दुर्दैवी आहे'.

'गैरव्यवहाराचा आरोप त्रास देण्यासाठी' : अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, 'माझ्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. परंतु, दोषारोपपत्रात 1 कोटी 72 लाखांचाच उल्लेख करण्यात आला आहे. यावरून माझ्यावरील गैरव्यवहाराचा आरोप हा केवळ मला त्रास देण्यासाठी केल्याचे स्पष्ट होते', असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

'नोट बंदीचा सर्वसामान्यांना त्रास' :नोटबंदी बाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'जुन्या एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटबंदीने सर्वसामान्यांना बराच त्रास झाला. आता 2 हजाराच्या नोटांची बंदी करण्यात आली आहे. ही बंदी का करण्यात आली त्याबद्दल थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत'. नोटबंदी कोणत्या अर्थतज्ज्ञाला विचारून केली असा सवालही अनिल देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. त्याला काय प्रतिसाद मिळतोय ते पहावे लागेल, असे देशमुख शेवटी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar : '..म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे', शरद पवारांचा मोठा आरोप
  2. Devendra Fadnavis On Jayant Patil : जयंत पाटलांवरील ईडीच्या कारवाईबाबत फडणवीस म्हणाले, 'तपास यंत्रणा..'
  3. Jayant Patil ED Inquiry : जयंत पाटील यांची ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी; बाहेर येताच म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details