महाराष्ट्र

maharashtra

मोदी-पवार भेट म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न - पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Jul 18, 2021, 3:47 AM IST

राजनाथ सिंह यांनी माजी संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांना संरक्षण खात्याच्या ब्रिफिंगसाठी बोलावले होते. आता नरेंद्र मोदींनी शरद पवारांना पाचारण केले आहे. हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

congress senior leader prithviraj chavan reaction on sharad pawar narendra modi meeting
मोदी-पवार भेट म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न - पृथ्वीराज चव्हाण

कराड (सातारा) -काही दिवसांपुर्वी राजनाथ सिंह यांनी माजी संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांना संरक्षण खात्याच्या ब्रिफिंगसाठी बोलावले होते. आता नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना पाचारण केले आहे. हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्या भेटीत काय झाले, यावर टीपण्णी करणे योग्य नाही, असेही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण कराड येथील पत्रकार परिषदेत बोलताना...

देवेंद्र फडणवीसांच्या दाव्याची उडवली खिल्ली

भाजप महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. या संदर्भातील प्रश्नावर बोलताना भाजप हा पहिल्यापासून त्या मूडमध्ये आहे. परंतु, लोकांना आणि आपल्या पक्षाला आपले सरकार येतंय, अशी आशा दाखवायचं विरोधी पक्षाचे कामच असते, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्याची खिल्ली उडवली.

भाजपमधील नेते पक्ष सोडून काँग्रेसमध्ये यायला लागले आहेत. काही दिवसांपुर्वी सुनील देशमुख हे काँग्रेमध्ये आले. त्याप्रमाणे अनेक नेते येत आहेत. त्यांना थांबवण्याकरिता काही नेत्यांना मध्यतंरी मंत्रीपदाचीही हूल दाखविली होती. त्यामुळे सरकार पडेल आणि मीच येणार, अशा घोषणा सुरू आहेत. विरोधी पक्षांचे ते कामच आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जरंडेश्वर कारखान्याविषयी काय म्हणाले चव्हाण

सातार्‍यातील जरंडेश्वर कारखान्यावरील ईडीच्या कारवाईबाबत बोलताना चव्हाण यांनी जरंडेश्वर कारखाना आणि राज्य सहकारी बँक, हे दोन्ही विषय वेगळे असल्याचे सांगितले. राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला होता. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मला भेटले होते. बँकेकडे लायसन्स नव्हते. बँकिंग लायसन्ससाठी अर्ज करताना बँकेला 1100 कोटींचा तोटा होता. रिझर्व्ह बँकेने केवळ आम्हाला विचारून प्रशासक नेमला. फक्त आमच्या मागणीनुसार आमचे अधिकारी प्रशासक म्हणून नेमले, असा खुलासाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. प्रशासकांनी दोन-तीन महिन्यात 1100 कोटींचा तोटा 700 कोटींवर आणला. त्यामुळे राज्य सहकारी बँक वाचली, असे माझे मत असल्याची पुष्टीही पृथ्वीराज चव्हाणांनी जोडली.

मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात 49 कारखाने कमी किंमतीने विकले गेले आणि खासगी लोकांनी ते विकत घेतले. त्याची चौकशी सुरू होती. त्यात पुढे काय निष्पन्न झाले, हे मला माहीत नाही, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भ्रष्टाचार होणे आणि मनी लाँड्रींग होणे वेगळे. एखादी संस्था विकत घेताना पैसे कुठून आले, हे तपासले जाते. आपला काळा पैसा परदेशात पाठवून परदेशातून पैसे आले तर त्याला मनी लाँड्रींग म्हणतात. ईडी फक्त मनी लाँड्रींगमध्ये तपासाला येते. जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात ईडीचा काय संबंध आला. त्याबद्दल मला माहिती नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

ईडीच्या केसमध्ये कोणाला आतापर्यंत शिक्षा झाली?

ईडीच्या चौकशा इतक्या सुरू आहेत, पण एकही चौकशी शेवटपर्यंत जात नाही. कुठे तरी अडकून बसते. तडजोड होते की काय होते, मला माहीत नाही. ईडीच्या एकाही केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आहे आणि ती शिक्षा कोर्टाने दिली आहे, असे माझ्या ऐकिवात नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा -अभिमानास्पद! साताऱ्यामधील कवठे गावचे सुपूत्र सुजित पाटील ठरले लष्करातील सर्वात युवा मेजर जनरल

हेही वाचा -अजिंक्यताऱ्यावर सापडला ऐतिहासिक चौथरा अन् ब्रिटिशकालीन पेटी

ABOUT THE AUTHOR

...view details