महाराष्ट्र

maharashtra

Hurda Jowar Rate Increased : हुरडा ज्वारीला मिळतोय 300 रुपये दर; खव्वयांची संख्या वाढतीवरच...

By

Published : Feb 11, 2023, 5:48 PM IST

Hurda Jowar Increased

ज्वारीचा दर जास्तीत जास्त 50 रुपये किलो इतका आपल्याला माहीत आहेत. मात्र तब्बल तीनशे रुपये किलो दराने ज्वारी विकली जाते, असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण सांगलीच्या बेडग येथील तानाजी नलावडे हे शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून तीनशे रुपये किलो दराने 'हुरडा ज्वारी' विकतात. विशेष म्हणजे ज्वारीच्या खव्वयांची संख्या वाढल्याने हुरडा ज्वारीचे दरसुद्धा वधारले आहेत.

हुर्डा ज्वारीविषयी माहिती देताना शेतकरी

सांगली: ज्वारी हा प्रत्येकाच्या घरातील रोजच्या जेवणातील एक आवडता पदार्थ. ज्वारी पासून भाकरी बनते, जी पौष्टिक म्हणून समजली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारामध्ये ज्वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्वारीची किंमत बाजारात साधारणपणे 20 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत फार तर पन्नास रुपये किलो इतकी आहे. ज्यामध्ये ज्वारीचे वेगवेगळे प्रकार महाराष्ट्राच्या अनेक भागात घेतले जातात. विशेषतः दुष्काळी पट्ट्यात कमी पाण्यात रब्बी हंगामात येणारे हे ज्वारी पीक. ज्याला 'शाळू' म्हणून देखील ओळखले जाते.

सेंद्रिय पद्धतीने ज्वारीचे पीक: मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी तानाजी विठ्ठल नलावडे गेल्या तीन वर्षांपासून 'हुरडा' ज्वारीचे उत्पादन घेतात आणि तब्बल तीनशे रुपये किलो दराने ही हुरडा ज्वारी विकतात. सेंद्रिय पद्धतीने ज्वारीचे उत्पादन नलवडे आपल्या शेतात घेतात. ही हुरडा ज्वारी ते विकतात आणि याला सांगली शहरासह जिल्ह्यात चांगली मागणी देखील आहे. तानाजी नलवडे हे आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये हुरडा ज्वारी घेतात. सेंद्रिय पद्धतीने त्यांची हे ज्वारीचे पीक घेतले जाते. हा 'हुरडा ज्वारी' नलवडे थेट ग्राहकांना घरी पोहचविण्याचे काम देखील करतात. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये हुरडा पार्टीचेही नियोजन नलवडे करतात.

बाजारात हुरडा ज्वारीला सुगीचे दिवस: याबाबत तानाजी नलवडे ईटीव्ही मराठीशी बोलताना म्हणाले, सेंद्रिय शेती लोकांना कळावी हा आपला हेतू आहे. त्यातून 'हुरडा' ज्वारीचे बियाणे आणण्यासाठी औरंगाबादपर्यंत आपण जाऊन आलो. मात्र त्यावेळी तिथे मिळाले नाही, योगायोगाने सांगलीत उपलब्ध झाले. पण एक किलो हुरडा ज्वारीची किंमत खूपच अधिक होती. तरीही आपण घेतली आणि त्यातून त्याचा पीक घेऊन ते वाढविण्यास सुरुवात केली. आता त्याला चांगली मागणी देखील आली आहे. हुरडा ज्वारीला तीनशे रुपये दर मिळतो. कारण त्याची चव रेग्युलर ज्वारीपेक्षा वेगळी आहे. शहरातले जे लोक चवीने खातात ते या हुरडा ज्वारीला अधिक पसंती देतात आणि एकमेव चव हा गुण हुरडा ज्वारीचे आहे. गोड आणि मधाळ हे याचे वैशिष्ट्य आहे. सांगली शहरात घरपोच 300 रुपये किलो दराने आम्ही हुरडा ज्वारी देतो. त्याच बरोबर गूळ देखील देतो. तर सेंद्रिय शेती कळावी म्हणून शेतात हुरडा पार्टी ऊसाच्या शेतावर करावी लागते. त्यामुळे त्याचा 400 रुपये दर आहे. इतर शाळू आणि हुरडा ज्वारीमध्ये चवीचे असणारा फरक यामुळे हुरडा ज्वारीला इतका दर मिळतो.

हुरडा ज्वारीचे उत्पादन फायदेशीर: हिवाळ्यात तानाजी नलावडे यांच्या शेतातली 'हुरडा ज्वारी' खाण्यासाठी अनेकजण थेट त्यांच्या शेतात हुरडा ज्वारीची पार्टी करण्यासाठी येतात. याठिकाणी नलवडे चुलीवर कोवळ्या हुरड्याचे कणीस भाजून देतात. शेतातील हुरडा पार्टी झाल्यावर जाताना तीनशे रुपये किलो दराची हुरडा ज्वारी विकत घेऊन जातात. तानाजी नलवडे हे सेंद्रिय शेती व उत्पादन घेण्याबाबत शेतकरी आणि ग्राहकांमध्ये जागृती करण्याचे काम देखील करतात. सेंद्रिय शेती शाळा याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी तानाजी नलवडे हे जिल्ह्यासह राज्यभर फिरतात. हुरडा ज्वारी उत्पादनासाठी त्यांच्याकडील हुरडा ज्वारी शेतकऱ्यांना देखील देतात. शेतकऱ्यांना जर किमान अर्धा एकर क्षेत्रात सेंद्रिय पध्दतीने 'हुरडा ज्वारी' पिकाचे उत्पादन घेतल्यास दोन पैसे अधिकचे मिळतील. ज्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते, असे मत तानाजी नलवडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकर यांनी केला आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न; ओतले अंगावर पेट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details