महाराष्ट्र

maharashtra

रायगड जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकाच कोविड लसीकरणाचा साठा

By

Published : Apr 8, 2021, 5:02 PM IST

Updated : Apr 8, 2021, 5:11 PM IST

उद्यापासून जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना लस उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागणार आहे. लसीकरणाला नागरिकांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड कोरोना व्हॅक्सीन
रायगड कोरोना व्हॅक्सीन

रायगड -राज्यात कोविड लसीचा साठा दीड दिवस पुरेल इतका शिल्लक आहे. रायगड जिल्ह्यातही आज एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात 59 केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 35 हजार नागरिकांनी कोविड लस टोचून घेतली आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना लस उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागणार आहे.

लसीकरणाला नागरिकांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड जिल्ह्यात 16 जानेवारीपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, पोलीस, महसूल, स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना पहिल्या टप्यात कोविड लसीकरण मोहीम देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तर तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिकांनी या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात ५० हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 35 हजार रायगडकरांनी कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत.

जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

जिल्ह्यात कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध झाले होते. जिल्ह्यात २० लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. फ्रन्टलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेले रुग्ण आणि 45 वर्षावरील नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात 59 केंद्रांवर रोज कमीतकमी 100 जणांना लस टोचली जात आहे. मात्र सध्या लसीचा साठा हा कमी प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आलेली आहे. तर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय, पनवेल, उरण, कर्जत याठिकाणी लसीकरण सध्या सुरू असले तरी आज दिवसभर पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्र लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास बंद होणार आहेत.

'साठा प्राप्त होताच लसीकरण पुन्हा करणार सुरू'

जिल्ह्यात आलेल्या लसीकरण साठ्यामधून आतापर्यंत 1 लाख 35 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज एक ते दीड दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. लस शासनाकडून लवकरच प्राप्त झाल्यास पुन्हा लसीकरण मोहीम जोरदारपणे सुरू केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सांगितले.

Last Updated :Apr 8, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details