महाराष्ट्र

maharashtra

Irshalwadi Landslide : 19 जुलै अनेकांसाठी शेवटची रात्र, इर्शाळवाडीतील नागरिकांवर कोसळला दुःखाचा डोंगर; मुख्यमंत्री घटनास्थळी

By

Published : Jul 20, 2023, 4:25 PM IST

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढवा घेतला आहे. रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

Irshalwadi Landslide
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड :जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यात २८८ व्यक्तींसह सुमारे ४८ कुटुंबे राहत होती. 19 जुलै 2023 ची रात्र त्यांच्यापैकी अनेकांसाठी शेवटची रात्र ठरली. जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट असल्याने मागच्या २४ तासात संततधार पाऊस सुरू आहे. या धुंवाधार पावसामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी आपत्कालीन परस्थिती असल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा दिवसभर महाड, पोलादपूर, खेापोलीसह विविध ठिकाणी गुंतलेली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत :इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यामुळे लोकांचे मनोबल उंचावले असून मदत कार्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बाधित लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली. मदतकार्य लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जखमींना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

भूस्खलनाच्या यादीत इर्शाळवाडीचा समावेश नाही : इर्शाळवाडीची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या मदतीची माहिती दिली. मदतकार्याला गती देण्यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यामुळे सरकारी पातळीवर निर्णयांचा वेग वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात सरकारने केलेल्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती दिली. केंद्रीय यंत्रणांनी तयार केलेल्या संभाव्य भूस्खलनाच्या यादीत या जागेचा उल्लेख नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रात्रीपासूनच बचावकार्याला गती :अपघातग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी मंत्री गिरीश महाजन सकाळीच घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील निर्णय तातडीने घेण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत, खाणमंत्री दादाजी भुसे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या रात्रीपासूनच बचावकार्याला गती देण्यासाठी प्रशासनाच्या संपर्कात होत्या. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना दिलासा दिला.

हेही वाचा -Maharashtra Monsoon session : इर्शाळवाडीत माळीणच्या पुनरावृत्तीनंतर नेत्यांना पडला प्रश्न? सभागृहात झाली 'या' प्रश्नांवर झाली चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details