महाराष्ट्र

maharashtra

योग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - द्रौपदी मुर्मू

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 9:18 PM IST

President Droupadi Murmu : योग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. योग प्रणाली शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक तसंच आध्यात्मिक उत्कृष्टतेचं साधन म्हणून प्रभावी मानलं जातं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज लोणावळ्यात केलं.

President Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू

लोणावळा (पुणे )President Droupadi Murmu : योग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक उत्कृष्टतेचं माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी केलं. लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा प्रसंगी त्या बोलत होत्या. 'शालेय शिक्षणात योगाचे एकीकरण' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारंभाचं उद्घाटन मुर्मू यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी, सचिव सुबोध तिवारी उपस्थित होते.


योग शिक्षण अमूल्य देणगी : स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या 'कैवल्यधाम'च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आनंद झाला, असं सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, भारताचे योग शिक्षण जागतिक समुदायासाठी अमूल्य देणगी आहे. भारताच्या पुढाकारानं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 21 जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग प्रणाली ही आरोग्य कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते. ती संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं स्पष्ट केलं आहे.

योग शिक्षणाला महत्त्वाचं स्थान :मुर्मू पुढे म्हणाल्या, योगाच्या अमूल्य ज्ञानाचा आपल्या मुलांना, तरुण पिढीला फायदा व्हायला हवा. या उद्देशानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये योग शिक्षणाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. प्राचीन भारतातील गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थी, बौद्धिक ज्ञान तसंच आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणं हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे, असं मुर्मू म्हणाल्या.

योगविषयी महत्वपूर्ण संशोधन :आपल्या परंपरेत कैवल्य म्हणजेच मोक्ष हा सर्वोत्तम प्रयत्न मानला जातो. अर्थ, काम, धर्म या पायऱ्या पार करून माणसाला कैवल्य प्राप्त करायचं असतं. व्यावहारिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान एकमेकांना पूरक असल्याचं उपनिषदात स्पष्ट केलं आहे. समग्र शिक्षणामध्ये व्यावहारिक, आध्यात्मिक ज्ञानाची सांगड घातली जाते. योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे. हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधनानंतर मांडलं होतं. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात योगविषयी महत्वपूर्ण संशोधन केलं. विसाव्या शतकात स्वामी कुवलयानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी योगपद्धतीची वैज्ञानिकता, उपयोगिता नव्या ऊर्जेनं मांडली.

योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम : राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात होते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा देशातील महान व्यक्तिमत्त्व तसंच सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. स्वामीजींची योग शिकवण त्यांच्या शिष्य परंपरेनं पुढं नेली जात आहे, असंही राष्ट्रपती म्हणाल्या. स्वामी कुवलयानंद शाळांमध्ये योगशिक्षणाच्या प्रसाराला खूप महत्त्व देत असत. कैवल्यधाम संस्थान संचालित कैवल्य विद्या निकेतन नावाची शाळा इतर शाळांसमोर उदाहरण देण्यास प्रेरणा देईल, असंही त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन :यावेळी सुरेश प्रभू म्हणाले, लोणावळा या पुण्यभूमीत देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती आल्या आहेत. योग ही एक विद्या आहे. त्यामुळं त्याचा अभ्यास व्हावा. योग शास्त्र तसंच कला असल्यामुळं त्याचं त्याचं जतन व्हावं, असंही प्रभू म्हणाले. याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा माहितीपट दाखविण्यात आला. तसंच कैवल्यधाम प्रकाशनाच्या पुस्तकांचं प्रकाशन राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपती महोदयांनी कैवल्यधामचा इतिहास चित्ररूपानं मांडणाऱ्या गॅलरीला भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा -

  1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; शनिदेवाच्या चौथऱ्यावरुन घेणार दर्शन
  2. आमदार अपात्रता प्रकरणात सुनील प्रभू यांची उलटतपासणीत गंभीर चूक
  3. विरोधकांवर मुद्दाम गुन्हे दाखल, शेतकऱ्यांसाठी राज्यभर निषेध मोर्चे काढणार - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details