महाराष्ट्र

maharashtra

Carry Dead body In Rickshaw: शववाहिनीला चालक नसल्याने मृतदेह रिक्षात घेऊन जाण्याची नातेवाईकांवर वेळ

By

Published : Jun 16, 2023, 3:55 PM IST

पुण्यातील कॅम्प परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. शववाहिनीचा चालक उपलब्ध नसल्याने मृतदेह रिक्षामध्ये घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. यात अजूनही धक्कादायक बाब, म्हणजे कॅन्टोन्मेंटमधील रुग्णालयाचे शवागारही बंद पडल्याने नातेवाईकांना मृतदेह रिक्षामधून ससून रुग्णालयात घेऊन जावा लागला.

Carry Dead body In Rickshaw
रिक्षातून मृतदेह नेताना नातेवाईक

पुणे: कोरोनाच्या काळात देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर म्हणून पुणे शहराचे नाव प्रामुख्याने पुढे आले होते. त्यादरम्यान मृत रुग्णांचे हाल होताना सर्वांनीच पाहिले आहे. असे असले तरी मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिनी आणि त्यांचे चालक उपलब्ध नसल्याचे चित्र आजही पुण्यासारख्या शहरात पाहायला मिळत आहे.

काय आहे घटनाक्रम? -पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या मोदीखाना येथे राहणाऱ्या चाबुकस्वार कुटुंबातील ९५ वर्ष वयाच्या वृध्द आजीचा मृत्यू झाला. नवा मोदीखाना कॅम्प येथून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या पटेल रुग्णालयात मृतदेह शवागारमध्ये ठेवण्यासाठी रात्री १० वाजता घेऊन जायचे होते. नातेवाईक बोर्डाच्या धोबी घाट येथील वाहनतळ येथे शववाहिनी आणायला गेले असता तिथे त्यांना शववाहिनीचा चालक उपलब्ध नसल्याचे कळले. शेवटी नातेवाईकांनी या आजींचा मृतदेह रिक्षातून कॅन्टोमेंट रुग्णालयाच्या शवागारात आणला. परंतु, शवागार बंद असल्याने या नातेवाईकांना पुन्हा एकदा मृतदेह रिक्षामधूनच ससून रुग्णालयात घेऊन जावे लागले. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शववाहिनी आहे पण चालक नाही :पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या वाहन विभागात वाहन चालकांची प्रचंड कमतरता आहे. रात्रीच्यावेळी तर केवळ अग्निशमन गाडी सोडून शववाहिनीसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी गाडी उपलब्ध असूनही ती चालवण्यासाठी चालकच उपलब्ध नसतो. ही गंभीर बाब काल रात्री समोर आली. यामुळे मृताच्या नातेवाईकांना मृत शरीर चक्क रिक्षात घेऊन जावे लागल्याने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

शासकीय हलगर्जीपणामुळे जातोय प्राण: शासकीय रुग्णालयातील प्रशासनाचा हलगर्जीपणा अनेकदा समोर आलेला आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील मांगरूळ गावात 2 जुलै, 2021 रोजी घडली होती. यामध्ये मांगरूळ गावातील आरोग्य केंद्राच्या हालगर्जीपणामुळे एका आदिवासी महिलेची टेम्पोतच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच, दुसऱ्या शहरातील शासकीय रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत नवजात बाळही दगावले आहे. या घटनेमुळे नातेवाईकांनी आरोग्य केंद्राबाबत संताप व्यक्त केला.

'आरोग्य केंद्र बंद असल्याने घडली घटना:अंबरनाथ तालुक्यात मलंगगड परिसरातील म्हात्रेपाडा कातक़री वाडीत एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील वंदना वाघे यांच्या काल मध्यरात्रीच्या सुमारास पोटात दुखायला लागले. त्यानंतर नातेवाईक त्यांना जवळ असलेल्या मांगरूळ गावातील आरोग्य केंद्रात टेम्पोतून घेऊन गेले. मात्र, येथील आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हे आरोग्य केंद्र बंद आहे. दरम्यान, वंदना यांना येथील उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच वंदना यांची टेम्पोतच प्रसूती झाली. याच काळात नवजात बाळ दगावले. या घटनेनंतर वंदना यांचे नातेवाईक चांगलेच संतापले. मांगरुळ येथील आरोग्य केंद्र बंद असल्यानेच बाळ दगावले असा आरोप त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details