महाराष्ट्र

maharashtra

Pune Crime News : २५० वर्ष जुन्या भांड्याच्या विक्रीचं आमिष दाखवून १ कोटीची फसवणूक, आरोपी पैसे घेऊन पसार

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 8:57 AM IST

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील बारामतीत चार जणांनी मिळून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांनी फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत आरोपी फिर्यादीचे पैसे घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलाय. वाचा पूर्ण बातमी.

fraud
फसवणूक

बारामती : Pune Crime News : २५० वर्ष जुन्या काशाच्या भांड्याची विक्री करून २०० कोटी रुपये मिळवून देतो, असं सांगत चार लबाडांनी मिळून एकाची तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी रफिक इस्माईल तांबोळी (रा. लोहगाव), सिराज शेख उर्फ पानसरे (रा. कोंढवा), उमेश उमापुरे (रा. कासारशिरसी, जि. लातूर) आणि धनाजी पाटील (रा. सांगली) या चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. राजेंद्र शेलार (रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अशी केली फसवणूक : फिर्यादी राजेंद्र शेलार यांची २०१४ ते २०१६ दरम्यान आरोपी रफिक तांबोळी याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना त्याचा आळंदी येथे लिटिगेशनचा प्लाॅट असून तो क्लिअर करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचं सांगितलं होतं. प्लाॅटची विक्रीतून ५० कोटी रुपये मिळणार असून, त्यातील ४ कोटी रुपये तुम्हाला देतो, असं त्यानं शेलार यांना सांगितलं. त्यामुळे शेलार यांनी त्याला १ लाख रुपये रोख दिले.

वारंवार पैशांची मागणी केली : १५ दिवसानंतर तांबोळी याने शेलार यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी शेलारी यांनी त्याला २ लाख रुपयांची मदत केली. त्यानंतर आरोपी वारंवार पैशांची मागणी करत गेला. शेलार यांनी आधी त्याच्या खात्यात ४ लाख ६५ हजार रुपये, त्यानंतर आरोपी रफिक तांबोळी आणि त्याची पत्नी आतिया या दोघांच्या खात्यात १२ ते १७ लाख रुपये टाकले.

आरोपी पैसे घेऊन पसार झाला : २०१७ मध्ये शेलार यांनी तांबोळीकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने माझ्याकडे काशाचे भांडे असून ते २५० वर्षांपूर्वीचे आहे. त्या भांड्यात वीज पडून इलेक्ट्रीक पाॅवर तयार होते. हे भांडे नासा, इस्रोसारख्या संस्था विकत घेतात. त्याच किंमत २०० ते ३०० कोटी रुपयांची आहे, असं सांगितलं. परंतु या भांड्यात किती पाॅवर निर्माण झाली आहे याची पडताळणी करण्यासाठी मला फी भरावी लागेल. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही मला मदत करा, असं म्हणत शेलार यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्याला भुलून शेलार यांनी त्यांची ९० गुंठे जमीन विकून तांबोळीला ९० लाख रुपये दिले. त्यानंतर तो मोबाईल बंद करून पसार झाला.

पोलिसांचा तपास सुरू : यानंतर शेलार आर्थिक अडचणीत आले. रफिक तांबोळी याचा शोध घेताना त्यांची भेट शेख व उमापुरे यांच्याशी झाली. शेलार यांच्या अडचणीचा फायदा घेत या दोघांनीही काशाच्या भांड्याची कल्पना पुन्हा त्यांच्या डोक्यात उतरवली. त्यानंतर त्यांनी पुन्हा जमीन गहाण ठेवत १८ लाख रुपये या दोघांना दिले. धनाजी पाटील याने सुद्धा अशाच पद्धतीने अमिष दाखवत शेलार यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये उकळले. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. Online Game Fraud Case : ऑनलाइन गेम फसवणूक प्रकरण; आरोपी सोंटू जैनच्या अडचणी वाढणार
  2. Police Raid On Mobile Shop : ॲपल कंपनीच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री
  3. Angadia Extortion Case : मध्यप्रदेशातील खुनाच्या आरोपीनं मुंबईतील अंगडियांना लावला 6 कोटींचा चुना, न्यायालयानं ठोठावली कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details