महाराष्ट्र

maharashtra

विश्वहिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे परभणीत भजन आंदोलन

By

Published : Jul 17, 2021, 5:49 PM IST

Updated : Jul 17, 2021, 5:55 PM IST

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैदेचा निषेध करण्यासाठी आज (शनिवारी) परभणीत विश्वहिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले आहे.

परभणी भजन आंदोलन
परभणी भजन आंदोलन

परभणी -यंदाच्या आषाढी वारीला करण्यात आलेला विरोध आणि वारकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तसेच ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैदेचा निषेध करण्यासाठी आज (शनिवारी) परभणीत विश्वहिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासाच्यामार्फत वारकऱ्यांवर सुल्तानी अत्याचार!

राज्य सरकारचा आषाढी वारीला विरोध म्हणजे सरकारने अस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासाच्यामार्फत वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुल्तानी अत्याचार आहेत, असे मत यावेळी या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर त्याची नजरकैद हा त्याचाच एक प्रकार आहे, असे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी नमूद केले.

'...म्हणून भजन आंदोलन'

भर रस्त्यात वारकऱ्यांना पारंपरिक गणवेश उतरवायला लावणे, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्माच्या पताकाची अवहेलना करणे, हरीभक्त पारायण निरपराध संताना अटक करणे, त्यांना अपराध्याची वागणूक देणे, जागोजागी वारकऱ्यांची अडवणूक करणे, त्यांच्यावर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. संविधानाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र बहाल केलेले आहे. त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही. म्हणून विश्वहिन्दू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाद्वारे भजन आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी विश्वहिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी दिली.

वारकऱ्यांनी केल्या 'या' मागण्या

या प्रसंगी आंदोलकांनी बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक ठेवलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, त्यांच्यावरील सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठामध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपरिक उत्सव, सप्ताह , कीर्तन , प्रवचने, दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावेत. ज्याप्रमाणे कार्यालयात, बस प्रवास, थिएटर किंवा हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीला मान्यता दिली आहे, त्याप्रमाणे वारकऱ्यांच्या अनुष्ठांनांना अनुमती द्यावी. सरकारने वारकरी वर्गाच्या मागण्यासंर्दभात निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

आंदोलनात यांचा सहभाग

या आंदोलनात विश्वहिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे, बजरंग दलाचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर, महानगराध्यक्ष राजकुमार भांबरे, तुकाराम दैठणकर, गणेश काळबांडे, प्रसाद कुलकर्णी, मनीष देशपांडे, बापूराव सूर्यवंशी, भगवान पुरी, विश्वास दिवाडकर, प्रदीप मुळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Last Updated : Jul 17, 2021, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details