महाराष्ट्र

maharashtra

करोनामुळे वसईतील सुप्रसिद्ध चंडिका मातेचा यात्रोत्सव रद्द

By

Published : Apr 30, 2021, 10:30 PM IST

करोनामुळे वसईतील सुप्रसिद्ध चंडिका मातेचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. आज गाभाऱ्यात मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

famous Chandika Mata Yatra in Vasai was canceled due to Corona
करोनामुळे वसईतील सुप्रसिद्ध चंडिका मातेचा यात्रोत्सव रद्द

पालघर/वसई- राज्य भरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. पुन्हा एकदा शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही वसई जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या आई चंडिका मातेचा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून शुक्रवारी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पालखी पूजन करून साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला.

करोनामुळे वसईतील सुप्रसिद्ध चंडिका मातेचा यात्रोत्सव रद्द
नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील प्रसिद्ध असलेल्या प्राचीन कालीन चंडिका देवी मंदिर आहे. लाखोंच्या संख्येने भाविकभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येत असतात. तसेच या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने दरवर्षी आईच्या चैत्र यात्रोत्सवाला व पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सहभागी होतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी करोनाचे संकट असल्याने यावर्षीची यात्रा रद्द झाली. यामुळे भाविक भक्तांनी घराच्या घरी दीपोत्सव करून व आईची आरती करून हा उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी हा परिसर यात्रेनिमित्त दुमदुमून जातो मात्र सर्वत्र आज शांतता पाहायला मिळाली. यावर्षी भाविकांना प्रत्यक्षात जरी दर्शन घेता आले नाही तरी युट्युब द्वारे ऑनलाइन लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती श्री चंडिका देवी न्यासाचे अध्यक्ष हरिहर पाटील यांनी सांगितले आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

करोनामुळे यंदाचा उत्सव सुद्धा अगदी साधेपणाने साजरा केला आहे. दोन पुजारी, दोन विश्वस्त यांच्या उपस्थितीत गाभाऱ्यातच पालखी पूजन करण्यात आले. तसेच गावातील ग्रामस्थांनी सुद्धा घरच्या घरी राहून आनंदोत्सव साजरा करून चांगले सहकार्य करावे असे चंडिका देवी न्यास विश्वस्त मनोहर पाटील यांनी सागितले.

नाट्यप्रयोग, रांगोळी प्रदर्शन, पालखी सोहळा, कुस्त्यांचे सामने आदी कार्यक्रम रद्द

चंडिकेचा यात्रोत्सवात जूचंद्र गावातील कलावंत विविध प्रकारचे सामाजिक व समाज प्रबोधन करणारे विषय घेऊन नाट्यप्रयोग व रांगोळी प्रदर्शन यांचे सादरीकरण करतात.
श्री दत्त प्रासादिक बावनचाळ नाट्य मंडळ यांच्या तर्फे मागील ११४ वर्षांपासून विविध नाट्यप्रयोग केले जातात. करोनामुळे मागील दोन वर्षांपासून नाट्यप्रयोगाची परंपरा खंडित झाली आहे. यात्रेत नाटक सादर करण्यासाठी त्याची दोन ते तीन महिन्यापासूनच तयारी सुरू होते. त्याची स्क्रिप्ट तयार करणे, कलाकार निवड, त्याचा सराव यातून वेगळेच समाधान मिळते.कारण समाजापुढे एक संदेश पोहचविणे हा उद्देश असतो. परंतु करोनामुळे दोन वर्षांपासून नाट्यप्रयोग सादर होत नसल्याने आम्हा कलाकारांनाही याची खंत वाटत असल्याचे नाट्यकलाकार व दिग्दर्शक राजू पाटील यांनी सांगितले आहे. तसेच रांगोळी कलाकारांचेही रांगोळी प्रदर्शन होणार नाही यामुळे यात्रेत जो रांगोळी काढण्याचा आनंद असतो तो अनुभवायला मिळणार नाही असे रांगोळी कलाकारांनी सांगितले आहे.तर कुस्ती पैलवानासाठी असलेले कुस्त्यांचे जंगी सामनेही रद्द करावे लागले आहेत.
हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत

ABOUT THE AUTHOR

...view details