महाराष्ट्र

maharashtra

'गोदाम इनोव्हेशन्स'च्या माध्यमातून मिळणार खराब कांद्याची महिती; नाशिकच्या तरुणीचे संशोधन

By

Published : Nov 6, 2020, 3:11 PM IST

Warehouse Innovations

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ नाशिकमध्ये आहे. याच कांदा उत्पादक भूमितील एक शेतकरी कन्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आली आहे. कल्याणी शिंदे या तरुणीने चाळीत खराब झालेला कांदा शोधण्यासाठी एक यंत्र तयार केले आहे.

नाशिक - चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यातमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. ते टाळण्यासाठी नाशिक येथील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाळीतील खराब कांद्याची महिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.

नाशिकच्या कल्याणी शिंदे या तरुणीने खराब झालेला कांदा शोधण्यासाठी यंत्र तयार केले

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ -

नाशिकला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजार पेठ म्हणून ओळखले जाते. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी 40 टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो टन कांदा येथून निर्यात केला जातो. बाजारात भाव नसेल तर शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो. वातावरणातील बदलांमुळे चाळीत साठवलेला 40 टक्के कांदा खराब होतो. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कुटुंबातील कल्यानी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकरून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे तंत्र विकसित केले आहे.

कोण आहे कल्याणी शिंदे -

कल्याणी शिंदे ही नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. कल्याणीने कॉम्प्युटर इंजिनिअरची पदवी मिळवलेली आहे. इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना तिची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक येथील 'डिजिटल इम्पॅक्ट स्वेअर' नावाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये झाली. याच काळात तिचे लक्ष 'कांदा' या विषयाकडे वळले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असूनसुद्धा शेतकरी त्रस्त का हा प्रश्न तिला पडला? याबाबत संशोधन करण्यास तिने सुरुवात केली.

कांदा खराब होण्याची कारणे -

नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. चांगला भाव मिळाल्यास कांदा बाजारात विकला जातो. भाव चांगला नसल्यास हा कांदा चाळीत साठवून ठेवला जातो. यातील बहुतांशी कांदा हवेतील आर्द्रता आणि योग्य तापमान न मिळल्याने खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते. कांदा खराब होण्याची सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांना खूप उशीरा समजते. तोपर्यंत मोठ्या प्रमाणत कांदा सडून खराब झालेला असतो.

खराब कांद्याच्या वासावरून यंत्र देते माहिती -

साधारण शेतकऱ्याने 10 टन कांदा चाळीत साठवला तर त्यातील 30 ते 40 टक्के कांदा वातावरणामुळे खराब होतो. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन कल्याणी शिंदे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र विकसित केले आहे. हे डिव्हाईस कांदा चाळीत लावल्यानंतर कांदा खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास त्यातून निघणारा वायू डिटेक्ट करतो. शेतकऱ्याला तत्काळ याबाबत अलर्ट मिळतो.

स्टार्टअपमधून मिळाली चालना -

2018 मध्ये 'गोदाम इनोव्हेशन्स'ची कल्पना मांडल्यानंतर कल्याणीला 'डायरेक्टर ऑफ ओनीयन अँड गार्लिक रिसर्च सेंटर'कडून 3 लाख रुपयांचा निधी मिळाला. 'अनलिमिटेड इंडिया'कडूनही तिला 2 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून तिने काही ठिकाणी यशस्वीरित्या गोदाम इनोव्हेशन्सची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. पुढील वर्षात 35 कांदा चाळींमध्ये गोदाम इनोव्हेशन्सचे युनिट बसवणार असल्याचे कल्याणीने सांगितले.

हेही वाचा -केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी पुन्हा करणार आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details