नांदेड OBC Reservation : आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाजात निर्माण झालेली तेढ अजूनही कायम आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी करीत आहेत. तर ओबीसी समाजाकडून याचा विरोध केला जात आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 20 जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडं रवाना होणार आहेत. तर दुसरीकडं ओबीसी समाजाने देखील 20 जानेवारी पासून आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आंदोलनासाठी मराठा समाजाकडे 10 लाख गाड्या असतील तर आमच्याकडे पण 2 हजार गाढवं, मेंढरं तयार आहेत, आम्ही पण आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.
काय म्हणाले प्रकाश शेंडगे :रविवारी (7 जानेवारी) नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथे ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव मेळावा पार पडला. यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून प्रकाश शेंडगे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 3 कोटी मराठा, 10 लाख गाड्या, 1 हजार कोटी डिझेल खर्च करून गरीब मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे. गरीब मराठ्यांचं आंदोलन हे आरक्षणासाठी नसून ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आणण्यासाठीच आहे. तुम्ही आमचं आरक्षण धोक्यात आणण्यासाठी आंदोलन करणार आहात, तर आम्ही पण आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरच आंदोलन करणार. तुमच्याकडं 10 लाख गाड्या असतील, तर आमच्याकडे पण हजारो गाढवं, डुकरं, मेंढ्या असून त्यांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे.