महाराष्ट्र

maharashtra

Nanded Rain Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, दोन तरुण गेले वाहून... काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By

Published : Jul 28, 2023, 7:41 AM IST

नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात नांदेडसह किनवट, बिलोली, भोकर, मुखेड आर्धापुर, बीलोली, देगलुर, हिमायतनगर मुदखेड या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात 24 तासांत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सरासरी 891 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

Nanded Rain Update
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नांदेड :मुसळधार पावसामुळे असना नदीला पूर आला आहे. गुरुवारीसकाळपासून नांदेडमध्ये सुरू असलेल्या पावसाची शहरात 192 मिमी इतकी नोंद झाली आहे. अर्धापुर तालुकायतील लहान या गावात जिल्हा परिषद शाळेला पूर्ण पाण्याने वेढा घातला आहे. यात शाळेत उभ्या असलेल्या मोटारगाड्या अक्षरशः पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत. जिल्ह्यात किनवट तालुक्यातील किनवट ते मांडवी रस्त्यावरील एका नाल्याच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर, मुखेड तालुक्यातील राजुरा बु येथील प्रदीप बोयाळे हा 25 वर्षीय तरुण शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला होता. तेव्हा औराळमध्ये असणाऱ्या नाल्याला पूर आल्यामुळे वाहून गेला. त्याचा मृतदेह 2 किलोमीटर अंतरावर सापडला आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जनजीवन विस्कळीत :जिल्ह्यात पावसामुळे अर्धापुर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव या गावांत आसना नदीचे पूर्ण पाणी शिरले आहे. गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनवट तालुक्यातील सिंगारवाडी व सुंगागुंडा गावालगत असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे दोन्हीही गावांचा संपर्क तुटला आहे. दुधगाव या गावातील घरे पाण्याखाली गेली आहेत. किनवट येथील सुवर्णा धरणाच्या बॅकवॉटरमुळे अप्पाराव पेठच्या काही घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे तेलंगाणा प्रशासनाशी संपर्क साधून सुवर्णा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील 60 ते 70 घरांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात आठवड्यात झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे.

पाणीसाठा वाढण्याची शक्यता :राज्यात तब्बल महिनाभर उशिरा सुरु झालेल्या पावसामुळे नांदेडकरांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र आता विष्णुपुरी प्रक्लप सध्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी 352.55 मीटर इतकी वाढली आहे. पाण्याचा साठा 62.80 टक्के भरलेला आहे. पुढील काळात पावसाचा जोर असाच राहिल्यास प्रकल्पात पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत कुणीही अनावश्यक स्थितीत गर्दी करू नये, पुलावरून पाणी जात असेल तर गाडी चालविण्याचे धाडस करू नये. स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.


नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या भाकितानुसार आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने आपली संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात काल 26 जुलैच्या मध्यरात्री पासून पावसाने जोर पकडला. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील 1, भोकर तालुक्यातील 1, किनवट तालुक्यातील 5 अशा एकुण 7 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. किनवट येथे प्रशासनाने आवाहन करूनही बेल्लोरी नाला पूलावर वाहत्या पाण्यात पायी जाण्याच्या नादात अशोक पोशट्टी ही व्यक्ती वाहून गेली. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथील 25 वर्षे वयाचा प्रदिप साहेबराव बोयाळे हा तरुणवाहून गेला. याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.


अनेक ठिकाणी पूर: नांदेड जिल्ह्यात सर्वत्र होत असलेला पावसामुळे लहान-मोठे नदीनाले खळखळून वाहत आहेत. काही ठिकाणी पूर आलेला आहे. अशा स्थितीत नागरिकांना पाण्यात न उतरण्याचा, पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन त्यातून न चालविण्याचे, पाण्यातून न जाण्याचे आवाहन शासन वेळोवेळी करीत आहे. किनवट येथे बेल्लोरी नाल्यावर एका व्यक्तीने लोकांनी सांगूनही न ऐकता वाहत्या पुलातून पायी गेल्याने तो प्रवाहामुळे वाहून गेला. आपला जीव हा अधिक किंमती आहे. नागरिकांनी अशा स्थितीत संयमाने रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, आरोग्य विभाग, पोलीस विभाग हे परस्पर समन्वय ठेवून आहेत. यात कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.


गावात पुराचे पाणी :किनवट तालुक्यात इस्लापूर आणि शिवणी मंडळात रात्रीपासून संततधार पाऊस असल्याने इस्लापूर गावात पुराचे पाणी शिरले. मौजे दुधगाव, प्रधानसांगवी या गावांमध्ये काही घरे पाण्याखाली गेली. सुवर्णधरणाचे बॅकवाटर किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गावात असल्यामुळे पाणी गावात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा येथील प्रशासनाशी समन्वय साधला. या धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकजाम ते शिवणी, अप्पारावपेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ, धानोरा आदी रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली.

प्रशासनाकडून उपाययोजना :इस्लापूर येथे साईबाबा मंदिराजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या नाल्याचे पाणी पुलावरून जात असतांना 55 वर्षाचे फर्दूके हे व्यक्ती पाण्यात अडकले होते. येथील तलाठी बालाजी वसमतकर यांनी सुरक्षिततेसह पाण्यात उतरून या व्यक्तीला धोक्याच्या पातळी बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता जेसीबीची मदत घेऊन या व्यक्तीला वाचिण्यात आले. मुदखेड तालुक्यात बोरगावसिता या गावातील 2 शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी झाडावर चढून आसरा घेतला. वैजापूर पार्डी येथे सितानदीच्या पुराच्या पाण्याने पवार कुटूंबियाच्या घराला वेडा घातला. प्रशासनाने दक्षता घेऊन वेळीच उपाययोजना केल्या. धर्माबाद तालुक्यातील पाटोदाथडी, माष्टी, मोकळी या गावांचा संपर्क पाण्याने तुटला होता. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे बन्नाळी गावातल्या एका परिवाराला पुरात वाहून जातांना जीवदान मिळाले. पोलीस निरीक्षक अशोक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पंतोजी, जमादार सोमनाथ मठपती आदी सर्वांनी मिळून पांचाळ कुटुंबियांना बाहेर काढले.

रस्ता पाण्यामुळे बंद :उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता पाण्यामुळे बंद पडला होता. माहूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू होता. सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी झालेला आहे. पुराच्या पाण्यामध्ये लोणी खु. अर्धापूर येथील माधव फुलाजी सोळंके मंदिरामध्ये अडकले. बचाव कामासाठी अग्‍नीशमन दलाची टीम पाठव‍िण्‍यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे सर्व यंत्रणेला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बारड गावांमध्ये इंदिरानगर, शंकरनगर पांदन व भीमनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 10 कुटुंबातील 35 व्यक्तींना सुरक्षित जागी गावातील नातेवाईक यांचेकडे हलवण्यात आले. नागेली गावामध्ये मातंग वाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 25 व्यक्तींना सुरक्षित जागी (समाज मंदिर) हलवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाची सर्व टीम समन्वयाने गावोगावी लोकांसमवेत असून स्थानिक गावकरी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

हेही वाचा :

  1. Thane Rain Update : ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग! शहरात ९ ठिकाणी साचले पाणी
  2. Heavy Rain In Nagpur : नागपुरात पावसाचा हाहाकार; ८ तासात १२१ मिलिमीटर पावसाची नोंद
  3. Kas Lake Overflowed: सातारा जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी; कास तलाव भरल्याने प्रशासन व नागरिकांची चिंता मिटली

ABOUT THE AUTHOR

...view details