महाराष्ट्र

maharashtra

School Problems In Nagpur: महिनाभरापासून शाळेत मास्तरच नाही; निराश विद्यार्थ्यांनी गाठले जिल्हा परिषद कार्यालय

By

Published : Jul 24, 2023, 9:33 PM IST

शाळेत विद्यार्थी नाहीत म्हणून शाळा बंद पडली, अशा बातम्या नेहमीच वाचतो. परंतु विद्यार्थी असताना शिक्षक नाहीत म्हणून शाळा ओस पडल्याने, विद्यार्थ्यांना चक्क शंभर किलोमीटरचा प्रवास करून थेट जिल्हा परिषद गाठावी लागली आहे. ही घटना घडली आहे नागपूरच्या काटोल तालुक्यात.

Nagpur News
विद्यार्थ्यांची व्यथा

प्रतिक्रिया देताना शिक्षणाधिकारी

नागपूर: काटोल तालुक्यात मलकापूर हे गाव आहे. गावात प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या १५ इतकी असून, इयत्ता १ ते ५ वी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. गेल्या शैक्षणिक सत्रात एका शिक्षकाच्या भरवशावर शाळा सुरू होती. परंतु, मे महिन्यात शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर शाळेचे दरवाजेच कुणी उघडले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेतून आल्यापावली परतावे लागत आहे.

विद्यार्थ्यांनी गाठली जिल्हा परिषद : आज काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत गाठली. मीडियाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या व्यथा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्यापर्यंत पोहचवण्यात आल्या. त्यानंतर, तात्काळ मलकापूर शाळेवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी कुंभार यांनी सांगितले आहे.

शाळा सुरू करण्यात आली : काटोल तालुक्यात मलकापूर हे गाव शहरापासून साधारणपणे शंभर किलोमीटर दूर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या अवघी २०० ते ३०० इतकी आहे. या गावात प्रामुख्याने भटके विमुक्त नागरिक वास्तव्यास आहेत. समाजसेवकांच्या मदतीने गावात २०१६ साली शाळा सुरू करण्यात आली. मात्र, शिक्षकांच्या अभावी अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत. वर्ग १ ते ५ उपलब्ध आहेत, तर या शाळेत विद्यार्थी १५ आणि शिक्षक केवळ एक अशी परिस्थिती या शाळेची आहे.


शाळेत मास्तर आलेच नाहीत : यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळजवळ आता महिना पूर्ण होत आहे. मलकापूर गावातील विद्यार्थी रोज शाळेत जात आहेत. आज तरी मास्तर आपल्याला शिकवण्यासाठी येतील, या एका आशेवर हे विद्यार्थी रोज शाळेत जातात आणि निराश होऊन घरी परत येतात.



समाजसेवकांनी मांडली व्यथा : गेल्या महिन्यापासून शाळेत एकही शिक्षक येत नाही. त्यामुळे विद्यार्थी हताश झाले होते. शिक्षणाची गोडी असताना देखील त्यांना शिक्षण मिळत नाही. या संदर्भात गावातील नागरिकांनी अनेकवेळा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. अखेर आज सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावातील काही नागरिक थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत.



अखेर शिक्षकाची झाली नियुक्ती : जिल्हा परिषदेचे कार्यालय उघडण्यापूर्वी मलकापूरचे विद्यार्थी जिल्हा परिषदेबाहेर आल्याचे शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना कळले. शिवाय मीडियाने देखील हा विषय त्यांच्यासमोर लावून धरला. त्यामुळे तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर आजच या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश दिला जाईल असे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Dead Calf Found in Khichadi: शालेय पोषण आहाराच्या खिचडीत शिजली चक्क पाल; १२२ विद्यार्थ्यांनी खाल्ली खिचडी
  2. Happy Girl Rest Room : जिल्हा परिषद शाळेत मुलींसाठी हॅपी गर्ल रेस्ट रूम, वाचा सविस्तर
  3. Jaitadehi ZP School : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलवली बाग; शाळेत टरबूजाची पार्टी

ABOUT THE AUTHOR

...view details