महाराष्ट्र

maharashtra

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 6 दिवसांत अडीच लाख दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात वाढ

By

Published : Aug 12, 2020, 5:20 AM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे ६ दिवसांमध्ये २ लाख ६६ हजार ४५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे. सध्या सात धरणांमध्ये ७ लाख ७२ हजार ३५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.

water supply dam of mumbai
मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरण

मुंबई- मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला होता. या दरम्यान दोन वेळा मुंबईची तुंबई झाली होती. मात्र, हाच पाऊस धरण क्षेत्रातही जोरदार बरसला आहे. गेल्या सहा दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २ लाख ६६ हजार ४५९ दशलक्ष लिटरने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे सात धरणांमध्ये ७ लाख ७२ हजार ३५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून धरणांतील पाणीसाठा ५३.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा पुढील पाच महिने मुंबईकरांची तहान भागवेल इतका असल्याचे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

४ ऑगस्टला सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. परंतु, तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असून मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणात ७ लाख ७२ हजार ३५५ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणी कपात केली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे.

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाने व्यक्त केला आहे.

११ ऑगस्टपर्यंतचा सातही धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा - ८०,१२२
मोडक सागर - ७८,६७१
तानसा - ७४,२६४
भातसा - ३,९५,३००
मध्य वैतरणा - १,८,२५४
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०४६
एकूण - ७,७२,३५५

ABOUT THE AUTHOR

...view details