महाराष्ट्र

maharashtra

Uday Samant On Opposition MLA Agitation : शिल्लक राहिलेल्या विरोधक आमदारांच्या आंदोलनात दम नाही - मंत्री उदय सामंत

By

Published : Jul 17, 2023, 9:36 PM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवारांचे आमदार आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. या मुद्द्यावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत की, अजित पवार हे सत्तेत सामील झाले. याचे कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात शिंदे-फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले. आता उरलेल्या आमदारांच्या आंदोलनात काहीच दम उरला नाही.

Uday Samant On Opposition MLA Agitation
मंत्री उदय सामंत

विरोधी पक्षाच्या आमदारांच्या आंदोलनावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मुंबई :राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांनी आजही कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेमध्ये सामील झाल्या कारणाने विरोधकांच्या आंदोलनात ते सामील झाले नाहीत. परंतु, शरद पवार गटासोबत राहिलेले आमदार विरोधकांच्या आंदोलनामध्ये सहभागी नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

शरद पवार गटाचे आमदार अनुपस्थित :वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले व भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांच्या नेतृत्वात मागील दोन्ही अधिवेशनामध्ये नित्य नियमाप्रमाणे दररोज पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार हे अग्रस्थानी असताना 'पन्नास खोके, एकदम ओके' ही घोषणा फार गाजली. परंतु आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत त्यांच्या काही समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. यामुळे विरोधकांची संख्या रोडावली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस तसेच उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली; परंतु याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटासोबत असलेल्या आमदारांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

आंदोलनचा फक्त दिखावाच :एकीकडे राष्ट्रवादीतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या अजित पवार गटाकडून शरद पवार यांची सातत्याने मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार विरोधात केलेल्या आंदोलनात शरद पवार गटाचे आमदार अनुपस्थित असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या मुद्द्यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत की, शिल्लक राहिलेल्या विरोधक आमदारांनी आंदोलन केले; पण त्या आंदोलनात काहीच दम नव्हता. अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिला व ते सरकारमध्ये सामील झाले. याचे कारण सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात, राज्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे; परंतु विरोधकांकडून फक्त आंदोलन करण्याचा दिखावा करण्याचे काम केले जात आहे. विरोधकांच्या कुठल्याही आंदोलनामध्ये दम नाही. राज्याला सर्वसमावेक्षक मुख्यमंत्री लाभले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राची पूर्ण भौगोलिक माहिती आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

राकॉंचे २८ आमदार अनुपस्थित :पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटाचे एकूण २८ आमदार अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ५३ आमदार आहेत. आमदार नवाब मलिक हे सध्या तुरुंगात असल्यामुळे राष्ट्रवादीकडे ५२ आमदार आहेत. त्यापैकी बंडखोर अजित पवार गटाचे १५ आमदार उपस्थित होते, तर शरद पवार गटाचे ९ आमदार उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. Sharad Pawar : 'मला कितीही लोक येऊन भेटले तरीही माझ्या भूमिकेत बदल होणार नाही'
  2. Jayant Patil On Sharad Pawar Role: शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही- जयंत पाटील
  3. Sanjay Gaikwad Reaction : आगामी निवडणुकीपूर्वी रस्सीखेच; शिंदे गट लढवणार शंभरच्यावर जागा, संजय गायकवाड यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details