महाराष्ट्र

maharashtra

राज्यात 75 ठिकाणी उभारणार नाट्यगृह, 386 कोटी रुपये देण्यात येणार- सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:27 AM IST

Sudhir Mungantiwar News : कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार असल्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली. कलावंताच्या संस्थांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आलं. यावेळी सुधीर मुनगंटीवार हे बोलत होते.

Sudhir Mungantiwar
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई Sudhir Mungantiwar News : नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करुन कलेचं क्षेत्र आणि समाजाची अभिरूची संपन्न करावी, शासन नेहमीच ठामपणानं नाट्यकला क्षेत्राच्या पाठीशी असेल, अशी भूमिका सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. सह्याद्री अतिथिगृह इथं प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील नोंदणीकृत 41 संस्थांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सहायक अनुदान धनादेश वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार असल्याचं जाहीर करुन प्रत्येकी 5 कोटीचा निधी देणार असल्याचंही जाहीर केलं.

प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 386 कोटी रुपये निधी देणार :कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासाठी नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी, म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणं नाट्यगृहासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कलावंतांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे :मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढं बोलताना म्हणाले की, ज्या संस्था प्रयोगात्मक कलेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्य करतात, सरकार त्यांच्या पाठीशी आहे. आपल्या संस्थांच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा करता आले असते, परंतु आपल्याशी संवाद व्हावा आणि राजाश्रय प्राप्त व्हावा, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत, त्यांना मदतीचा हात शासनकडून दिला जात आहे.

आज विज्ञान युगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे. पण सुख समृद्धीचा अभाव दिसत असून समाधान लोप पावत आहे. कलावंतांनी राज्याची संस्कृती जपत आपलं काम सुरू ठेवावं, शासन आपल्या सोबत आहे-सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार

कलावंतांच्या संस्थांना धनादेश वाटप :पटेल कल्चर फाउंडेशन मुंबई, वैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूर, अजित बालक मंडळ नागपूर, जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक नागपूर या संस्थांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला आहे. तर अय्यर फाउंडेशन मुंबई, संक्रीता फाउंडेशन मुंबई, प्रारंभ कला अकादमी ठाणे, तक्षशिला नृत्य कला मंदिर ठाणे, शाहीर शामराव खडके सांस्कृतिक लोककला मंडळ सावर्डी सोलापूर, जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा सोलापूर, सुंदरी सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सोलापूर, सप्तरंग थिएटर्स अहमदनगर, स्वानंद सांस्कृतिक मंडळ नागपूर, आदित्य बहुउद्देशीय संस्था रामटेक नागपूर, पिराजी बहुउद्देशीय संस्था नागपूर, ऑरेंजसिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर, प्रेरणा अल्पसंख्यांक महिला बाल व युवक कल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था वाशिम या संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला आहे.

चंद्रपूरमधील फ्लाईंग क्लबचं काम वेगानं पूर्ण करा :चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरू करण्याचा संकल्प आहे. या अनुषंगानं प्रशासकीय स्तरावर वेगानं कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. नागपूर फ्लाईंग क्लबच्या चार आसनी विमानाचं मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आलं आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रितसर परवानगी घेऊन धावपट्टीचं कार्पेटिंग, धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंती ही कामं वेगानं पूर्ण करावीत, अशा सूचना देखील यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

काय आहे चंद्रपूर फ्लाईंग क्लब योजना :सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर इथल्या फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथी इथं सोमवारी घेण्यात आली. नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावं, यासाठी चंद्रपूर इथं फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान 3 शिकाऊ विमानं खरेदी करणं आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमानं मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. या फ्लाईंग क्लबबाबत नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेण्यात येईल, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस, मंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी; विदर्भवादी नेत्यावर गुन्हा दाखल
  2. Maharashtra Politics : नेहरु सिगारेट घेण्यासाठी विमान पाठवायचे हे चालतं का? मुनगंटीवारांचा विरोधकांना सवाल
  3. Sudhir Mungantiwar Criticized Lalu : लालू यादव यांच्या मोदी यांच्यावरील ‘त्या’ विधानाने संताप; सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details