महाराष्ट्र

maharashtra

"हिंमत असेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा, ठाकरे गटाकडून मी ठराव मांडतो", भास्कर जाधवांचं सभागृहात आव्हान

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 4:57 PM IST

Ajit Pawar CM : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी, अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याचं आव्हान दिलं आहे. माझ्या पक्षाकडून मी हमी घेतो, असंही ते यावेळी म्हणाले.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav

मुंबई Ajit Pawar CM : "भारतीय जनता पार्टीमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करावं. माझ्या पक्षाच्या वतीनं मी ठराव मांडतो आणि हमी घेतो", असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान ते बोलत होते.

कोकणाला २० हजार कोटी रुपये देण्याची मागणी :"कोकणातील शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसानं झोडपलं आहे. मात्र राज्य सरकारकडून राज्यातील केवळ अन्य विभागांनाचं प्राधान्य देण्यात येतं. कोकण प्रांत महाराष्ट्रात येत नाही का?", असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी केला. "कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या. त्यासाठी स्वतंत्र आयएएस अधिकारी नेमण्याचं मान्य केलं, मात्र त्यापुढे काहीही झालं नाही. कोकणातील योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पर्यटन, मासेमारी आणि बागायतदार या तिन्ही वर्गाला न्याय मिळाला नाही. सरकारला जर कोकणासाठी योजना राबवायच्या नसतील, तर किमान कोकणाला २० हजार कोटी रुपये कर्ज द्या, आम्ही आमच्या पद्धतीनं विकास करू", असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

मत्स्य व्यावसायिकांचं कर्ज माफ करा : मासेमारी हा कोकण किनारपट्टीवरील लोकांचा मुख्य व्यवसाय. मात्र येथील अनेक लोकांकडे स्वतःची जमीन नाही. त्यांची घरं असलेली जमीन जी त्यांच्या नावावर नाही, ती त्यांच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी यावेळी केली. तसेच, २०१४ ते २०१९ दरम्यान शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून डिझेल परतावा वॅट मिळाला नव्हता. तो आता मिळाला आहे. मात्र त्या दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज आणि त्याचं व्याज माफ करण्यासंदर्भात सरकारसोबत चर्चा झाली होती. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांचं ७२० कोटी रुपयांचं कर्ज सरकारनं माफ करावं, अशी मागणी भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं आव्हान : भास्कर जाधव बोलत असताना सत्ताधारी बाकावरून, अडीच वर्षात तुम्ही काय केलं असा सवाल विचारण्यात आला. यावरून जाधव अतिशय संतप्त झाले. "तुम्ही कोरोना आणलात म्हणून राज्य ठप्प झालं. त्याला तुम्ही जबाबदार आहात", असा पलटवार त्यांनी केला. "महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. आम्ही त्यांच्याकडेच दाद मागत आहोत. ते काहीतरी करतील असं वाटतं म्हणूनच बोलतो", असं ते म्हणाले. "तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर अजित पवार यांना आता मुख्यमंत्री करा. माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्याचा ठराव मी करून देतो. त्याची हमी मी घेतो", असं आव्हान भास्कर जाधव यांनी यावेळी दिलं.

हे वाचलंत का :

  1. आजच्या आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली, उद्या दिल्लीत जाणार- शरद पवार
  2. शेतकरी झाला कासावीस खोके सरकार ४२०, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details