महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Crime : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली आजोबांची फसवणूक ; सह्या, अंगठे घेऊन बळकावले घर

By

Published : Jan 22, 2023, 2:20 PM IST

Mumbai Crime

मुंबईत लक्ष्मण पवार नावाच्या 78 वर्षीय आजोबांची कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. आरोपींनी कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांच्या सह्या आणि अंगठे घेऊन लक्ष्मण पवार यांचे राहते घर लुबाडले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या सुखकर्ता इमारतीत राहणाऱ्या 78 वर्षीय आजोबांना गंडा घालून त्यांचे राहते घर स्वतःच्या नावावर करून घेतले आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 406, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सुनील गायकवाड, अनंत भोसले, चंद्रजीत उर्फ सोनू यादव या तीन आरोपींच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी 78 वर्षे आजोबांना कर्ज मिळवून देतो सांगून लुबाडले आहे.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल :78 वर्षीय व्यक्तीची फसवणूक नोव्हेंबर 2016 ते आजतागायत झालेली आहे. 20 जानेवारीला समजताच त्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण लिंबाजी पवार हे 78 वर्षीय गृहस्थ काळाचौकी येथील सुखकर्ता इमारतीत राहतात. सुखकर्ता इमारतीतील लक्ष्मण पवार यांचे स्वतःचे घर आता स्वतःच्या मालकी हक्काचे राहिलेले नाही. सुनील गायकवाड अनंत भोसले आणि चंद्रजीत उर्फ सोनू यादव लक्ष्मण पवार यांची फसवणूक करून कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांच्या सह्या आणि अंगठे घेऊन लक्ष्मण पवार यांचे राहते घर लुबाडले आहे.


आर्थिक फसवणूक केली :तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असल्याचा फायदा घेऊन यातील सुनील गायकवाड, आनंद भोसले आणि चंद्रजीत उर्फ सोनू यादव या आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांचे घराचे कागदपत्रावर लक्ष्मण पवार यांच्या सह्या आणि अंगठे घेऊन त्यांचे राहते घर हे त्यांचे नकळत आरोपी चंद्रजीत यादव यांनी त्याचे नावे विक्री करून घेतले. परस्पर संतोष वर्मा नामक व्यक्तीला ते घर विक्री केले आहे. या घरावर संतोष वर्मा याने एक कोटी दहा लाख रुपये एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे कर्ज घेतले आहे. आरोपितांनी तक्रारदाराच्या वयाचा फायदा घेतला. त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. तक्रारदार लक्ष्मण पवार यांच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा हा अर्ज चौकशी करून पोलीस आयुक्त परिमंडळ 4 यांच्या परवानगी घेऊन दाखल करण्यात आलेला आहे. या फसवणूक प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मराठे हे करत आहेत.

हेही वाचा : Mumbai Crime : इन्शुरन्स पॉलिसीबाबत आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details