महाराष्ट्र

maharashtra

Konkan Railway : कोकण रेल्वे भारतात येत नाही का? असे का म्हणतात प्रवासी? जाणून घ्या...

By

Published : Aug 8, 2023, 9:12 PM IST

अमृत भारत योजनेत (Amrit Bharat Yojana) कोकणतील रेल्वे स्थानकांचा समावेश नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वे (Konkan Railway) हा भारताचा भाग नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अमृत भारत योजनेच्या यादीत कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने कोकणातील प्रवाशांनी खंत व्यक्त केली आहे.

Amrit Bharat Yojana
Amrit Bharat Yojana

मुंबई : अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत (Amrit Bharat Yojana) पहिल्या टप्प्यात तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्चून देशातील ५०८ स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५०८ स्थानकातील विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोकण रेल्वेवरील एकाही स्थानकाचा अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेत नाव नाही. त्यामुळे कोकणातील जनतेने भारतीय रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त करत कोकण रेल्वे (Konkan Railway) भारतात येत नाही का? असा संतप्त प्रश्न विचारला आहे.

१ हजार ३०९ स्थानकांचा कायापालट : विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांत सुविधा पुरविण्यासाठी भारतीय रेल्वेने अमृत भारत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील एकूण १ हजार ३०९ स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रविवारी ५०८ स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भुमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले आहे. परंतु, पहिल्या यादीत कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने कोकणातील प्रवाशांनी खंत व्यक्त केली आहे.

अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेत मडगांव रेल्वे स्थानकाचा समावेश आहे - एल. के. वर्मा, कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

कोकण रेल्वेच्या विकासाला फटका : गणपती, शिमगा, उन्हाळी सुट्ट्या, दिवाळी या काळात मोठ्या प्रमाणात मुंबईतले चाकरमानी आपल्या गावाला जात असतात. गावातून देखील अनेक जण मुंबईत नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असतात. ही संख्या इतकी असते की अनेक वेळा रेल्वेला जादा गाड्या सोडाव्या लागतात. मात्र, असे असताना देखील अद्यापही कोकण रेल्वेचा समावेश भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आलेला नाही. याचा मोठा फटका कोकण रेल्वेच्या विकासावर देखील पडताना दिसतो. याच कारणामुळे अमृत भारत योजनेत करण्यात येणाऱ्या रेल्वेस्थानकांच्या विकासात कोकण रेल्वेला स्थान मिळालेले नाही.

मुंबई गोवा महामार्गाची चाळण :ज्याप्रमाणे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची बोंब आहे. त्याचप्रमाणे कोकणातील रेल्वे स्थानकांची देखील बोंब आहे. त्यामुळे कोकणी प्रवाशांनी नेमका प्रवास करवा तरी कसा? हा प्रश्न आहे. मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. तर, रेल्वेने प्रवास करायचा म्हटले तर रेल्वे स्थानक देखील व्यवस्थित नाहीत. या भागातील दिवाणखवटी, गोरेगाव रोड, अंजनी, खारेपाटण, वेरवली, सापे वामने, सौंदळ, कडवई, निवसर, कळंबणी बुद्रुक या रेल्वे स्थानकांमध्ये योग्य उंचीची फलाटे देखील नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे वैभववाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात दोन प्लॅटफॉर्मना जोडणारा पूल देखील बांधण्यात आलेला नाही. अशा एकूणच परिस्थिती पाहता कोकणवासीयांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

कोकण रेल्वेसाठी निधीची कमतरता : कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने आता हे कामही रखडले आहे, त्यामुळे कोकण रेल्वे हा भारताचाच भाग नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोकण रेल्वेचा अद्याप भारतीय रेल्वेत समावेशच करण्यात आलेला नाही. कोकण रेल्वेची सुरुवात ही बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्यात आली. या तत्त्वातील पहिला टप्पा म्हणजे बांधा. हा 1998 साली पूर्ण झाला. त्याचा दुसरा टप्पा वापरा हा त्यानंतर लगेचच सुरु करण्यात आला, तो आज देखील सुरू आहे. मात्र, याचा तिसरा टप्पा हस्तांतरित करा हा अध्यापही पूर्ण झालेला नाही.

हेही वाचा -

  1. Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला पायलट, जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी यश
  2. Lasalgaon Railway Station: लासलगाव रेल्वे स्थानकाचे पालटणार रुपडे; पंतप्रधानांच्याहस्ते होणार उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details