महाराष्ट्र

maharashtra

Shinde BJP Government : आधी रोजगार, महागाईचे प्रश्न सोडवा, मग हिंदुत्वाचे बघू सर्वसामान्यांची जनभावना

By

Published : Apr 13, 2023, 6:40 PM IST

Updated : Apr 14, 2023, 7:10 PM IST

राज्यात हिंदुत्ववादी विचारांचा स्तोम माजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपने अयोध्या दौराचा डामडौल करत, आगामी निवडणुकीपूर्वीचे वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात सत्ता स्थापन करु, असा शिंदे सेना आणि भाजपला विश्वास ही व्यक्त आहे. मात्र आधी सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सोडवा, मग हिंदुत्वाचे बघू अशी सर्वसामान्यांची जनभावना असल्याचे दिसून येत आहे.

Shinde BJP Government
Shinde BJP Government

राज्यात हिंदुत्ववादी विचारांचा स्तोम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करत अयोध्या दौरा काढला. राज्यात अवकाळी, गारपीट होत असताना, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला गेले, अशा शब्दांत विरोधकांनी टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांनी यावर प्रत्युत्तर देताना, हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख केला. येत्या काही महिन्यांत आगामी निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे आहेत. शिंदे सेना, भाजपला अयोध्या दौरा फलदायी ठरेल. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व सोडून राज्यातील जनसमुदाय हिंदुत्व स्विकारतील, असा शिंदे सेनेला आत्मविश्वास आहे. परंतु, महाराष्ट्रात आजवर धर्माच्या मुद्द्यावर राजकारण खपवून घेतले जात नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.


हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतांचा जोगवा :दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंना देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कधीही मते मिळाली नाहीत. उलट सहा वर्षासाठी त्यांना मतदानास बंदी घातली होती. आताच्या राजकारण्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व्याख्या बदलून हिंदुत्वाचा विचार मते मिळवण्यासाठी करत आहे. भारतातील जनता सुज्ञ आहे. लोकशाही काय आहे, हे जनता चांगलीच जानते. त्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता ठाम उभी राहत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. परंतु, काही वेळेला लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, राजकीय लोक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहेत. एकनाथ शिंदे किंवा भाजप असो, आगामी निवडणुकीत हिंदुत्वाच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतील, असे किंचित ही वाटत नाही. आज देशात, महाराष्ट्रात जटील प्रश्न आहेत. केवळ घोषणांवर शासन आणि राजकारण चालत नाही. चांगल्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज आहे. शिंदे सरकार मध्ये अंमलबजावणीचा अभाव आहे. त्यामुळे सध्या हिंदुत्वाचा स्तोम माजवला जातो आहे. राजकारणात त्याचा फार काही फायदा होईल, असे वाटत नाही. आधी प्रश्न सोडवा, हिंदुत्वाचे नंतर बघू, अशी सर्वसाधारण भावना आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी मांडले.


धर्माच्या नावावर राजकारण होऊ नये :राज्यात हिंदुत्वाच्या नावाखाली, राजकीय पोळी भाजली जात आहे. महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावरुन लक्ष विचलीत करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. लोकांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जातो आहे. आजवर धर्माचे राजकारण खपवून घेतले जात नाही. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना मतदार चांगला धडा शिकवतील, असे राजकीय विश्लेषक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. तसेच धर्माच्या नावावर राजकारण होऊच नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


शिंदेंना फायदेशीर वातावरण :अयोध्या दौऱ्यानंतर शिंदे गटाला फायदेशीर वातावरण आहे. भगव्याची लहर महाराष्ट्रात निर्माण होईल. शिंदे सेना आणि भाजप हे भगवाधारी एकत्र काम करतील. २०२४ मध्ये महाविकास आघाडी भगवाधाऱ्यांपुढे टीकणार नाही. युतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप आणि आम्ही हिंदुत्वाच्या विचारांवर काम करत आहोत. २०१९ मध्ये झालेली चुक दुरुस्त करत आहोत. महाराष्ट्रात छत्रपती शिवराय, हिंदुत्ववादी, प्रभू श्रीराम यांच्या विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आगामी काळातील निवडणुका भाजप, शिवसेना एकत्र लढवून बहूमताने सरकार स्थापन करु. महाविकास आघाडी असो किंवा उद्धव ठाकरे यांनी किती ही वज्रमूठ बांधली तरी भगवाधाऱ्यांपुढे ते टीकणार नाहीत, असा विश्वास शिंदे सेनेचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला.


घराणेशाहीचे हस्तक आणि वारसदार :सध्या समाजवादी बेगडे चेहरे असून हिंदुत्ववाद्यांना डॅमेज करणे, देव धर्माला शिव्या घालणे, संतांना शिव्या घालणे, वारकऱ्यांना शिव्या देवून सत्तेत येण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे, शेतमजूर, गोरगरीब लोकांचे त्यांना काहीच घेण देण नाही. घराणेशाहीचे हस्तक आणि वारसदार असल्याने त्यांना सत्तेत यायचे आहे. परंतु, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर शिवसेना चालवत आहोत. सर्व जनतेला मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप - शिवसेना युती महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे सेनेचे प्रवक्ते वाघमारे म्हणाले.


हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा बेरोजगारीचे प्रश्न महत्वाचे :आगामी निवडणुकांना आता वेळ राहिलेला नाही. महाराष्ट्रातील जनता मिंध्यांना दाखवून देईल. ज्या प्रभू श्री रामाच्या भूमीत गेले, त्या भूमीतील नितीमत्ता, संस्कार, संस्कृती प्रभू श्रीरामाने भारत भूमीला दिली. मिंधे गटाकडून ती पाळली जात नाही. हा दौरा करुन काय साध्य केला. भाजपने संपूर्ण मिंधे सरकार हायजॅक केला आहे. त्यांना वाटेल तेव्हा सरकार मोडीत ते काढू शकतात. परंतु, हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा देशासह महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, गरीबी सारख्या लोकांच्या महत्वाच्या समस्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी आदी विषयांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी आयोध्या दौरा वारंवार उल्लेख केला जातो आहे. लोकांना मूळ मुद्द्यांवरुन संभ्रमीत करण्यासाठी प्रशांत किशोर यांची एजन्सी लावली आहे. चॉकलेटपेक्षा रॅपर कसा चांगला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी शिंदे गटाला लगावला.


मिंधेंना जनता जागा दाखवेल :शिंदे गटाच्या सभा, सभेसाठी जबरदस्तीने आणलेली गर्दी, विविध सर्वेतून उमटणाऱ्या जनभावना, सोशल माध्यमातून लोकांच्या तीव्र प्रतिक्रीयाच मिंधेंना जागा दाखवतील. तसेच सर्वपक्षीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचे सरकार यावे, असे सातत्याने वाटत आहे. युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरेंचे व्हिजन जनतेला हवे आहे. केवळ चिठ्ठ्या वाचणारा व्यक्ती महाराष्ट्राला व्हिजन देऊ शकणार नाही. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यांना त्यांची जागा दाखवेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिली.

हेही वाचा - Nanhi Pari Foundation : मुलींच्या आरोग्य, शिक्षणासाठी झटतेय नन्ही परी फाउंडेशन

Last Updated : Apr 14, 2023, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details