महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar : शरद पवारांनी केली 'या' नेत्यांची कायम पाठराखण

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 6:53 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कठीण प्रसंगात मदत केली नाही. तसंच माझी चूक नसताना राजीनामा घेतला, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी बीडमध्ये केलं होतं. त्यानंतर अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी त्यांची री ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वास्तविक पवारांनी या सर्व नेत्यांना अनेकदा पाठीशी घातल्याच्या प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई :अजित पवार गटातील नेते तसंच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत बोलताना शरद पवार यांनी तेलगी घोटाळ्यात माझा राजीनामा घेतला, असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी पवारांनी आपल्याला कोणतीही मदत केली नाही, असंही सभेत म्हटलं होतं. त्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांनी बीडमधील सभेत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. बीड जिल्ह्यानं शरद पवारांवर प्रेम केलं असं शरद पवारांनी सांगितलं होतं. मात्र, बीडसाठी शरद पवारांनी काय केलं असा सवाल धनंजय मुंडेंनी केला होता.

सर्व नेत्यांना पवारांची मदत : दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी वक्तव्य करताना शरद पवार यांनी राज्यात एकहाती सत्ता आणली नाही, त्यांच्या काही मर्यादा आहेत, असं अप्रत्यक्षपणे वक्तव्य केलं. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी सांगितलं, हे वक्तव्य करणाऱ्या सर्व नेत्यांना शरद पवारांनी नेहमीचं मदत केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. छगन भुजबळ यांचं नाव तेलगी घोटाळ्यात होतं.

पवार कुटुंबाचं भुजबळांना सहाय्य : यात काहीअंशी तथ्य असू शकतं. मात्र त्यापेक्षा शरद पवारांनी तेलगी घोटाळ्यात छगन भुजबळांची बदनामी होऊ नये, म्हणून त्यांना एका वाहिनीवरील हल्ल्याच्या प्रकरणात राजीनामा द्यायला लावला. वास्तविक पवारांनी त्यांना अतिशय सुरक्षितपणे या प्रकरणापासून दूर नेलं होतं. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ तुरुंगात असताना शरद पवारांच्या कुटुंबानं त्यांना सर्वतोपरी सहाय्य केलं. सुप्रिया सुळे भुजबळांना दोनवेळा तुरुंगात भेटायला गेल्या होत्या. हा नैतिक आधार खूप महत्त्वाचा असतो, जो पवार कुटुंबानं दिला, असं चोरमारे यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडेंवर विश्वास : नवाब मलिक जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा त्यांना पवार कुटुंबानं खूप आधार दिला. शरद पवार यांनी शेवटपर्यंत त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नाही. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा प्रकरणामध्ये शरद पवारांनी मदत केली. प्रत्यक्षपणे त्यांनी मदत केली नसली, तरी त्यानंतर धनंजय मुंडे यांना विरोधीपक्ष नेतेपद, मंत्रीपद देऊन त्यांच्यावर विश्वास असल्याचं दाखवून दिलं होतं.

देशमुखांना पवारांचा धीर : अनिल देशमुख तुरुंगात असतानाही सातत्यानं शरद पवारांनी त्यांच्या बाजूनं वक्तव्य करून धीर दिला होता. भारतीय जनता पक्षासोबत छगन भुजबळ सत्तेत सहभागी झाले. मात्र, भुजबळांना विधानसभेत चंद्रकांत पाटांलांनी भुजबळ तुम्ही जामीनावर बाहेर आहात, हे विसरू नका असं सुनावलं होतं. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ जामीनवर बाहेर आहेत, मात्र त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, असं चोरमारेंनी म्हटलं आहे.

चोरांच्या उलट्या बोंबा :यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दत्ताजीराव देसाई यांनी म्हटलं की, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं नेहमीच महाराष्ट्राला, त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना बळ दिलं. त्यांच्या सहकाऱ्यांच्या लाख चुका पोटात घातल्या. सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, असं अतानाही पवारांनी त्यांना नेहमीच साथ दिली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, नवाब मलिक या सर्व नेत्यांना शरद पवारांनी नेहमीच पाठबळ दिलं. मात्र, आता भाजपाच्या दावनीला गेलेल्या नेत्यांना शरद पवारांच्या मदतीचा विसर पडलाय असं मत डी. एच. देसाई यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. Protest By Dam Victims :अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं सरकारविरोधात मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन
  2. VBA Reaction On INDIA : उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही 'वंचित'ला 'इंडिया'त स्थान नाही
  3. Sanjay Raut News : राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हल्ला होण्याची भीती-संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details