महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं; मनसेचा आरोप

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 3:24 PM IST

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लाईन वाहतुकीसाठी खुली करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र राज्य सरकार काम पूर्ण करण्याच्या नादात अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करताना दिसत आहे. सिमेंट काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्यांचा वापर होत नसल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे.

Mumbai Goa Highway Work
मुंबई-गोवा महामार्गाविषयी सांगताना मनसे प्रवक्ता योगेश चिले

मुंबई-गोवा महामार्गाविषयी सांगताना मनसे प्रवक्ता योगेश चिले

मुंबई :गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम आता अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. ज्या कंत्राटदारांनी आता कामं केली नाहीत आणि आतापर्यंत वेळ वाया घालवला त्यांच्या विरोधात सरकार कारवाई करत आहे. तसंच आता नव्याने कंत्राटदारांना कामं दिली असून ही कामं वेगात सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या भाविकांना किमान मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन वापरता यावी यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने या रस्त्याच्या कामाची पाहणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि भाविकांना या मार्गावरून जाता येईल असा दावा सरकारच्या वतीनं चव्हाण यांनी केला आहे.


सरकारकडून कामामध्ये फसवणूक :मुंबई-गोवा महामार्गाचं काम जरी सध्या वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी पायी जाऊन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे काम वेगात सुरू केलं असून काम पूर्ण होत असल्याचा दावा या निमित्ताने सरकार करत आहे; मात्र हे काम म्हणजे जनतेची आणि प्रवाशांची फसवणूक असल्याचा चिले यांचा दावा आहे.

काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्यांचा वापर नाही :मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरू असून या कामांमध्ये मोठमोठे डंपर आणि सिमेंट मिक्सर मशीन रात्रंदिवस काम करत आहेत. एका लेनवर सातत्याने काँक्रीट उचलले जात आहे. मात्र, रस्त्यावर केवळ सिमेंट आणि खडी पोचली जात आहे. यामध्ये आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्या वापरल्या जात नाहीत. जर लोखंडी सळ्या वापरल्या गेल्या नाहीत तर या ठिकाणी असलेल्या कामांमध्ये निकृष्टपणा येणार असून हे सिमेंट काँक्रीट केवळ सहा महिन्यांमध्ये उखडू शकते. या रस्त्यावर पुन्हा-पुन्हा खड्डे पडू शकतात. ही केवळ जनतेच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक आहे. त्यामुळे सरकारने ही फसवणूक थांबवावी असं चिले यांनी म्हटलं आहे. चिले यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तेथील कामगारांशी बोलून हा दावा केला आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Goa Highway : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन 'या' तारखेपर्यंत होणार पूर्ण
  2. Nitin Gadkari on Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम 'या' महिन्यात होणार पूर्ण; नितीन गडकरींची मोठी घोषणा
  3. Mumbai Goa Expressway Toll Start : मुंबई-गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका सुरू, वाचा, काय आहेत टोलचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details