महाराष्ट्र

maharashtra

MPSC Admit Card Leak : एमपीएससीचा हॉल तिकीट डेटा लिक झाला, पण कसा? आयोगाने दिले 'हे' स्पष्टीकरण

By

Published : Apr 23, 2023, 4:10 PM IST

Updated : Apr 23, 2023, 5:40 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे; मात्र त्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिट कार्ड लिक झाले आणि परीक्षार्थी शिवाय इतर नागरिकांना ते उपलब्ध झाले. याबाबत 'ईटीव्ही भारत'च्यावतीने 'एमपीएससी'चे सहसचिव सुनील अवताडे यांना संपर्क केला असता त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले की, 'बाह्य लिंक दिल्यामुळे अ‍ॅडमिट कार्ड लिक झाले असावे; मात्र असे कोणतेही टेलिग्राम चॅनल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुरू केलेले नाही. बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

MPSC Admit Card Leak
एमपीएससी लोगो

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गेल्या पाच ते सात वर्षांपासून प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या आधी कुठल्यातरी घोटाळ्यामुळे चर्चेत येते. याच्या बातम्या माध्यमात प्रसारित देखील झाल्या आहेत. यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या 'सेल टॅक्स' आणि 'पीएसआय' यासह इतर 40 विविध पदांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करीत आहेत. सहा दिवसावंर ही परीक्षा आली आणि एका बनावट टेलिग्राम चॅनलवर एक लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिट कार्ड बेकायदेशीररित्या लिक झाले. ही बाब 'एमपीएससी'चे सदस्य देवानंद शिंदे यांना 'ईटीवी भारत'च्या वतीने लक्षात आणून दिली असता त्यांनी 'एमपीएससी' सहसचिव आणि सचिव यांच्याकडे कळवले. त्यानंतर आयोगाने खुलासा प्रसारित केला.


प्रश्नपत्र, सांख्यिकी डेटा सुरक्षित: 'एमपीएससी'च्या खुलाश्यानुसार टेलिग्राम चॅनेलद्वारे ऍडमिट कार्ड आणि काही इतर डेटा लिक झाल्याचे समजले आहे. याबाबत तात्काळ बाह्य लिंक बंद केली आहे. संदर्भात ज्यांनी याबाबत बेकायदेशीर कृत्य केले त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे; मात्र प्रश्नपत्रिका किंवा इतर सांख्यिकी डेटा लिक झालेला नाही. तसेच स्पर्धा परीक्षा पूर्व निर्धारित नियोजन पद्धतीने वेळेवर होईल, असे देखील अधोरेखित केले गेले आहे.



विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया: 'एमपीएससी' परीक्षेचेअ‍ॅडमिट कार्ड हे ओटीपी लॉगिन आणि पासवर्ड टाकून प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यक्तिगतरित्या उपलब्ध होते. तरी बाह्य लिंक दिल्यामुळेच अ‍ॅडमिट कार्ड टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करता आले आणि विद्यार्थ्यांची खासगी माहिती सार्वजनिक केली गेली. या घोळामागे बाह्य लिंक देणेच कारणीभूत ठरल्याची बाब विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केली. 'ईटीव्ही भारत'च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे संपर्क साधला असता सहसचिव सुनील अवताडे यांनी खुलासा पत्र नुकतेच जारी केलेले आहे, असे सांगितले.

अनधिकृत टेलिग्रॅमवर कारवाई करावी: या संदर्भात ईटीव्ही भारतने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अमोल मातेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येत आहे. त्याची प्रवेश पत्र हे लिक झालेली आहेत. ते एका टेलिग्राम चॅनेलवर कोणालाही पाहता येतात. तसेच डाऊनलोड करता येतात. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ अशा अनधिकृत टेलिग्रॅमवर कारवाई करावी, अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. मी एका सार्वजनिक कार्यक्रमात आहे. परंतु असे जर होत असेल तर ते उचित नाही. याबाबत सचिवाशी तातडीने मी बोलतो.

हेही वाचा:Urvashi Slams Sandhu : उर्वशीने उमैरला बदनामीची बजावली नोटीस; म्हणाली-अखिलवर केलेले छेडछाडीचे आरोप खोटे...

Last Updated :Apr 23, 2023, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details