महाराष्ट्र

maharashtra

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त? 'या' आमदारांची नावे चर्चेत

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 4:34 PM IST

State Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता आणखी एक मुहूर्त ठरला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं एक विधान आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई State Cabinet Expansion :राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil) हे लवकरच मंत्रीपदाची शपथ घेतील, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होतं. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराला अजित पवार यांनीच दुजोरा दिला आहे का असाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे. त्यामुळं मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

यापूर्वी अनेक मुहूर्त चुकले : २०२४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आलाय. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. परंतु, त्यानंतर पुन्हा विस्ताराबाबत फक्त चर्चा झाल्या व तो विस्तार आजतागायत रखडला आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारासाठी १५ ऑगस्ट, गणेश उत्सव, दसरा, दीपावली असे अनेक मुहूर्त चुकले. परंतु मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता नवीन वर्षाचा मुहूर्त जवळपास ठरविण्यात आल्याची चर्चा आहे.

इच्छुक आमदारांची इच्छा पूर्ण करण्याची तयारी? : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाले व सोबत आलेल्या आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात ते आघाडीवर राहिले. परंतु, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल या आशेने शिंदे गट, भाजपा, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आजही मंत्रिपदाच्या अपेक्षेवर आहेत. मागील अनेक महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कुठल्या ना कुठल्या कारणाने पुढे ढकलला गेला आहे. परंतु २०२४ लोकसभा निवडणुका तोंडावर असताना या मंत्रिमंडळाचा अखेरचा विस्तार करून अनेक इच्छुक आमदारांची इच्छा पूर्ण करण्याची तयारी सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दर्शवली असल्याची चर्चा आहे. मंत्रीपदाच्या वाटपावरून यापूर्वीच तिन्ही गटामध्ये फॉर्मुला ठरला असून, त्यानुसारच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी इच्छुक आमदारांची यादी फार मोठी असली तरी फार कमी आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार आहे अशीही चर्चा आहे.

नाराज आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न : राज्यात शिंदे - फडणवीस - अजित पवार यांचे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने अनेक इच्छुक आमदारांची निराशा झाली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर होण्याची चिंतासुद्धा व्यक्त केली जात आहे. अशात नाराज आमदारांनी पक्षांतर करू नये, या कारणास्तव त्यांना खुश करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सर्व इच्छुकांचा समावेश जरी करता आला नाही तरी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते वकील वैजनाथ वाघमारे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासाठी ही शेवटची संधी असून अनेक ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपदाची संधी भेटू शकते. महायुतीत मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला असून, त्यापद्धतीने मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. परंतु हा सर्वस्वी निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असून यामध्ये कोणीही दुखावले जाणार नाही, यावरही लक्ष दिले जाणार आहे.

अनेक आमदारांची नावे चर्चेत : मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाकडून आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय गायकवाड, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, यामिनी जाधव, बच्चू कडू, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर यांची नावे चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपाकडून आमदार गणेश नाईक, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, माधुरी मिसाळ, जयकुमार रावल, देवयानी फरांदे, संजय कुटे, मेघना बोर्डीकर, योगेश सागर यांची नावे चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाकडून वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र, या सर्व चर्चा असून, यावर अजून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया किंवा दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा -धारावी पुनर्विकास प्रकल्प भारतातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details