महाराष्ट्र

maharashtra

Lek Ladki Yojana : वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलींना मिळणार लाख रुपये; नेमकी योजना काय अन् कोण पात्र?

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 7:08 PM IST

Updated : Oct 10, 2023, 7:50 PM IST

Lek Ladki Yojana : राज्य सरकारनं मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत मुलींना अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये निधी दिला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Etv Bharat
लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजनेबद्दल माहिती देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : Lek Ladki Yojana : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'लेक लाडकी योजना' राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात असून, या निर्णयामुळं राज्यातील महिला वर्ग आनंदित होईल, असा सरकारचा अंदाज आहे.

महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय :राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारनं 'लेक लाडकी' ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडं पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका आहेत अशा कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन अपत्य असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. जर एखाद्या कुटुंबात पहिला मुलगा असेल आणि नंतर दोन जुळ्या मुली झाल्या तरीसुद्धा त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

टप्प्याटप्प्यानं निधी देणार : मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे तीन हजार रुपये, मुलगी शाळेत गेल्यानंतर तीन हजार रुपये, मुलगी पाचवीत गेल्यानंतर सहा हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत शासनाच्या वतीनं तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. यामुळं पालकांच्या डोक्यावरील मुलींचा शिक्षणाचा भार तसेच त्यांच्या पालनपोषणाचा भार कमी होणार आहे. त्यामुळं मुलगी ही आता जड वाटणार नसल्यानं मुलींचा मृत्यूदर निश्चितच कमी होईल. मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीनं चांगली पावलं उचलली जातील. तसेच महिला सक्षमीकरण यानिमित्तानं होईल, असा दावाही तटकरे यांनी केलाय.

हिंदु सण सर्वसमावेशक : हिंदू सण हे अतिशय उत्साहात पार पाडले जातात. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. मुख्य म्हणजे सुरक्षितता ही या सणांमध्ये पाहिली जाते. यावर्षीसुद्धा पोलीस प्रशासन हे सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत आहे. भारत हे नेहमीच सर्वसमावेशक असल्यानं, ते सण कोणा एका विशिष्ट जाती-धर्मासाठी असतील असं नाही. त्यामुळं हे सण शांततेत आणि सुरक्षिततेच्या वातावरणात पार पाडावे यासाठी आम्ही सरकारच्या वतीनं प्रयत्न करू, असं मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. BJP VS MNS over Toll issue in Maharashtra : राज्यात टोलच्या झोलवरून भाजपा-मनसेमध्ये जुंपली, नेत्यांची टोलेबाजी तर कार्यकर्त्यांची आंदोलने
  2. Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार; मुख्यमंत्र्यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर....
Last Updated : Oct 10, 2023, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details