महाराष्ट्र

maharashtra

Konkan Ganpati Special Train: कोकण गणपती स्पेशल रेल्वेच्या नियोजनाचे तीन तेरा ... आरक्षण करूनही प्रवाशांचे हाल

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 9:40 PM IST

दरवर्षी प्रमाणे यंदासुद्धा रेल्वेचं नियोजन फिस्कटल्याने कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित आणि गणपती विशेष गाड्यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे हालअपेष्टा सहन करत चाकरमान्यांनी कोकण गाठत असल्याचे चित्र दिसून आले. कोकण मार्गावर एकच रेल्वे मार्गिका, त्यातच गणपती विशेष गाड्याच्या भार असल्याने सर्वच रेल्वे गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Konkan Ganpati Special Train
Konkan Ganpati Special Train

मुंबई: गणपती दिवसात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या पाहता भारतीय रेल्वेकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य- पश्चिम रेल्वे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१२ गणपती विशेष गाड्या चालविणार येत आहे. या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रवाशांना सुविधेसाठी अनेक ट्रेनला अतिरिक्त डबे जोडण्यात येत आहे. मात्र, अशातच कोकण रेल्वेच्या मार्गावर केवळ एक मार्ग असल्याने नियोजित वेळापत्रक पाळणे रेल्वेला अवघड जात आहे. गणपती उत्सव असल्याने एका बाजूला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे नियओजीत गाड्यांना होणारा उशीर त्यामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये संताप दिसून आला.



चाकरमान्यांना १८ तासांचा प्रवास -कोकण रेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे चाकरमन्यांना १८ तासांचा प्रवास होतोय. सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे न वळविल्याने व मालगाडया सुरू ठेवल्याने उशीर, नियोजन बिघडल्याने लोक मुंबईतून ट्रेनने ३०० रुपयात गावाला येतात. स्टेशनला उतरल्यावर एक हजार रुपयाची रिक्षा करून घरी जायचे का ? असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.


आरक्षण करून फायदा काय?गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण आम्ही चार महिन्यापूर्वीपासून करून ठेवतोय. आम्ही येवढं करूनसुद्धा गाडीत इतकी गर्दी असते की, आरक्षित स्लीपर कोचमधून आम्हाला चालताही येत नाही. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण करून गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची इतकी गर्दी असते की, आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वे गाड्यातील आसनावरून टॉयलेटमध्ये जाण्यासाठी जागा उरत नाही. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात हीच परिस्थिती असते. रेल्वे मंत्र्यांनी कोकणातील जनतेकडे लक्ष द्यावेत अशी प्रतिक्रिया आरक्षित तिकीटधारक प्रवाशांनी दिली आहे.



दुहेरीकरण करण्याशिवाय पर्याय नाही-कोकणात जाणाऱ्या गाड्यांना केवळ एकेरी मार्ग असल्याने कोकणवासीयांची मागणी असतानाही रेल्वे प्रशासनाला गाड्या सोडता येत नाहीत. सणासुदीच्या दिवसात विशेष गाड्यादेखील उशीरा धावतात. स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे आर्थिक अडचणी येत आहेत. कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी केंद्र शासन व कोंकण रेल्वेशी संबंधित राज्य शासनांकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची माहिती कोकण विकास समिती सदस्य अक्षय महापदी यांनी दिली आहे.


तिकीट दलालांचा आधार-राहुल आंब्रे या कोकणातील चिपळूण येथे जाणाऱ्या प्रवाशाने सांगितले की, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा त्रास आम्हाला कोकणवासीयांना दरवर्षी गणपती उत्सवात सहन करावा लागतो. दरवर्षी गणपतीनिमित्त बुकिंग साईटवर सर्व जागा आधीच फुल दाखिवल्या जातात. हे कसं काय? यात नेमकं काय गूढ आहे? जुलै महिन्यात गणपतीनिमित्त आरक्षणाला सुरुवात झाली. मात्र, लगेचच दुसऱ्या मिनिटाला सर्व गाड्या फुल होत्या. अशावेळी अनेकांना तिकीट दलालांचा आधार घ्यावा लागतो. कमी पैशात मिळणार तिकीटही अधिकचे पैसे देवून खरेदी करावे लागते.

कोकण रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचे कारण काय?गणपतीनिमित्त गावाला जाणारे आणि कोकणातील गुहागर येथील रहिवासी सिद्धेश विचारे यांनी सांगितले की, गणपती उत्सवात कोकण रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचे कारण काय? रेल्वे प्रशासनाला गणपती उत्सवाच्या काळात हजारो चाकरमानी आपल्या गावाला जातात याची कल्पना नाही का? इतका कोणता तांत्रिक बिघाड झाला की जेणेकरून मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला?


कोणत्याही मार्गावरून गेलो तरी मनस्तापच -खेड येथील रहिवासी व कोकण रेल्वेचे प्रवासी सार्थक शेळके यांनी सांगितले की, सरकार आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे गर्दी आणि चेंगराचेंगरी आमच्या कोकण वासियांच्या पाचवीला पुजली गेली आहे. सणासुदीला कोकणात गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोच्या घरात आहे. यातील काही जण रेल्वेने जातात तर काही जण बाय रोड जातात. पण, आम्ही कोकणी लोक यापैकी कोणत्याही मार्गावरून गेलो तरी मनस्तापच सहन करावा लागतो. रेल्वेत चेंगराचेंगरी आणि रस्त्यावर खड्डे आहेत. अशातच आम्ही प्रवास करत आहोत. आता मुंबई गोवा महामार्गाबाबत न बोललेल चांगलं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिलीय.

  • रेल्वे प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, कोकण रेल्वेचे आणि मध्य रेल्वे प्रशासन हे सर्व प्रवाशांना आपआपल्या निश्चित स्थळी सुरक्षित आणि वेळेत पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याकरिता मध्य आणि कोकण रेल्वेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा-

  1. Ganeshotsav Muhurta 2023 : गणेशाच्या स्थापनासाठी कधी आहे मुहूर्त; पहा व्हिडीओ
  2. Ganesh Festival : अडीच कोटी रुपयांच्या नोटांसह नाण्यांची गणेश मंदिरात आरास, पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details