महाराष्ट्र

maharashtra

Avinash Bhosale : उद्योगपती अविनाश भोसले मंगळवार पर्यंत सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत

By

Published : May 27, 2022, 9:50 PM IST

उद्योगपती अविनाश भोसले (Industrialist Avinash Bhosale) यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. मुंबई सेशन कोर्टातील विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CBI Court) भोसले यांना 30 मे पर्यंत सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ( remanded in CBI custody till Tuesday) ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Avinash Bhosale
अविनाश भोसले

मुंबई:उद्योगपती अविनाश भोसले यांना गुरवारी रात्री सीबीआयने अटक केल्याची माहिती समोर आली. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मुंबई सेशन कोर्टातील विशेष सीबीआय न्यायालयाने भोसले यांना मंगळवार 30 मे पर्यंत सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यांना सीबीआयकडून पाहुणचार मिळणार आहे. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता.


सीबीआयकडून अविनाश भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना नजर कैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. भोसले यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकीलांनी रिमांडला विरोध केला. भोसले यांना वरळी इथल्या घरी किंवा सेंट रेजिस पंचताराकिंत हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.

त्यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवत त्यांना सर्व जेवण, मेडिकल सुविधा देण्याची तयारी दर्शवली. तसेच 28 आणि 29 मे रोजी एक तास 5 ते 6 या वेळेत त्यांचे वकिल विजय अग्रवाल आणि धवल मेहता यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. 30 मे रोजी अविनाश भोसले यांना सकाळी 11 वा कोर्टात घेऊन यावे असेही कोर्टाने सांगितले आहे. भोसलेंच्या रिमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे.



पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली. डीएचएफएल प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

डीएचएफएल घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80 च्या दशकात त्यांनी किरायाने रिक्षा देण्यापासुन व्यवसायाची सुरवात केली होती. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे. या शिवाय देशभरातील वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्टचे काॅंट्रॅक्ट, हाॅटेल्स अशा विविध व्यवसायात ते आघाडीवर आहेत.

हेही वाचा : Anil Deshmukh admitted : माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details