महाराष्ट्र

maharashtra

CM On Koshyari : ...म्हणून भगतसिंह कोश्यारींची ओळख महाराष्ट्राला कायम राहील; मुख्यमंत्र्यांचे स्तुतीसुमने

By

Published : Feb 17, 2023, 6:04 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राज्यपालांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य, महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. ते आज राजभवन येथे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निरोप संमारंभात बोलत होते.

Eknath Shinde
Eknath Shinde

मुंबई :महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांना निरोप दिला. महाराष्ट्रातील सव्वा तीन वर्षाच्या राज्यपालांच्या कारकिर्दीत ते नेहमीच वादग्रस्त राहिले होते. अशा प्रसंगी आता त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारल्यानंतर राज्यपाल आता पदभार मुक्त होत आहेत. त्या अनुषंगाने ते आज देहरादूनला रवाना होत असताना त्यांना नौदलांकडून मानवंदना देण्यात आली. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांना अखेरचा निरोप देत त्यांची भेट घेतली.


महाराष्ट्रासाठी योगदान : राज्यपालांची सव्वातीन वर्षाची कारकीर्द जरी वादग्रस्त राहिली असली तरी सुद्धा राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिंदे - फडवणीस सरकारवर राज्यपालांची छत्रछाया राहिली आहे. त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच, राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य तसेच महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याचे शिंदे म्हणाले. याप्रसंगी त्यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ, गणेशाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


उत्साह अतिशय वाखाणण्यासारखा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राज्यपालांना हनुमंतांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी राज्यपालांना भावी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्य, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, भगतसिंग कोश्यारीजी यांनी सातत्याने महाराष्ट्राला मार्गदर्शन केले. याही वयात त्यांचा उत्साह अतिशय वाखाणण्यासारखा आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात त्यांनी हिरीरीने दिलेला सहभाग आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. असे सांगत, महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी राज्यपालांचे आभार मानले.

नवीन राज्यपालांचा उद्या शपथविधी :कोश्यारींना राजभवनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी निरोप देण्यात आला होता. त्याच बरोबर राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी रमेश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिली आहे. नवे राज्यपाल रमेश बैस आज मुंबईत येणार आहेत. ते उद्या राजभवन येथील दरबार हॉलमध्ये दुपारी १२.४० वाजता शपथविधी घेतील.

हेही वाचा -Mumbai News: सर्वोच्च न्यायालय सुनावणी करेल तेव्हा सत्याचा विजय होईल - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details