महाराष्ट्र

maharashtra

Eknath shinde on Tour: मुख्यमंत्री दौऱ्यावर असतानाही कार्यरतच- दीपक केसरकर

By

Published : Apr 26, 2023, 7:56 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून सातारा दौऱ्यावर असून ते देवीच्या पूजेसाठी गेल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अचानक का ठरला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री हे दौऱ्यावर असतानाही कार्यरत असल्याचा दावा त्यांच्या पक्षाने आणि मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.

Eknath shinde on Tour
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री तीन दिवस सातारा दौऱ्यावर असल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले

मुंबई:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. ते सातारा दौऱ्यावर जाण्यामागे देवीच्या पूजेचे कारण दिले जात आहे. तर कुटुंबीयांसोबत ते विश्रांतीसाठी गेल्याचा दावा त्यांच्या पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्री सत्ता संघर्षाच्या काळात अचानक मुंबई बाहेर गेल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.



मुख्यमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी: दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करीत नागपूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले. हे पोस्टर काही वेळात काढून घेण्यात आले. तर दुसरीकडे धाराशिव मध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केली. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानंतर घडलेल्या या घटनांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर काहीतरी राजकीय उलथापालत होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पोस्टर्स काढून टाकण्याविषयी सांगितले असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.



मुख्यमंत्र्यांनी घेतली विश्रांती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नंतर जर कोणी अठरा तास काम करत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करत असतात. रात्री दोन वाजता सलाईन घेऊन आणखी काम करताना आम्ही त्यांना स्वतः पाहिले आहे. त्यामुळे शेवटी प्रकृती पेक्षा काहीही मोठे नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी सक्तीने सांगितले असेल तर त्यात गैर नाही. त्यांचा मुलगा स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे ते विश्रांतीसाठी साताऱ्याला गेले आहेत. मात्र तरीही ते तिथेही काम करीत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.



दौऱ्यावर असतानाही फाइल्स निपटारा:तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी दौऱ्यावर असले तरी त्यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील 65 फाईल्सचा निपटारा केला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाइल्स येत असतात त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा केला जातो. त्यामुळे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या 65 फाईलचा निपटारा केला आहे. तर राज्यात असलेल्या अवकाळी पावसाचे वातावरण पाहता मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांना तयारीत राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.



ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा: दरम्यान मुख्यमंत्री तीन दिवस सातारा दौऱ्यावर असल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, लगेच कुणीतरी नॉट रिचेबल आहे असे म्हणणे आधी थांबवा. मुख्यमंत्री कुठे गेले आहेत का? गेले आहेत याची मला माहिती नाही याबाबत मुख्यमंत्री कार्यालयच सांगू शकेल. त्यामध्ये आपल्याला रसही नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Maharashtra Politics बॅनरबाजीने रंगले नागपूरचे राजकारण सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे कार्यकर्त्यांचे स्वप्न

ABOUT THE AUTHOR

...view details