महाराष्ट्र

maharashtra

महापरिनिर्वाण दिन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही

By

Published : Dec 5, 2020, 7:09 PM IST

Updated : Dec 5, 2020, 7:31 PM IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी चैत्यभूमी हे स्मारक उभारण्यात आले आहे. चैत्यभूमीला ६ डिसेंबरला लाखो अनुयायी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात.

chaityabhumi
चैत्यभूमी

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला लाखो आंबेडकरी अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री १२ ते ६ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत चैत्यभूमीच्या गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ६ डिसेंबरला चैत्यभूमीत गाभाऱ्यात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करता येणार नाही. म्हणून चैत्यभूमीत आंबेडकरी अनुयायांनी येऊन गर्दी करू नये, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेकडून करण्यात आले आहे. आंबेडकरी अनुयायांनी ऑनलाईन, तसेच जिथे असाल तिथूनच अभिवादन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी माहिती देताना.

गर्दी करू नका -

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी चैत्यभूमी हे स्मारक उभारण्यात आले आहे. चैत्यभूमीला ६ डिसेंबरला लाखो अनुयायी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी याठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती असल्याने पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सोयी सुविधा केलेल्या नाहीत. आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता यावे म्हणून दूरदर्शनवर ऑनलाइन प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

हेही वाचा -महापरिनिर्वाण दिन - ‘कोविड–१९’च्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर 'पॅगोडा' बंद

असाल तेथून करा अभिवादन -

आंबेडकरी अनुयायांनी मुंबईत येऊन गर्दी करू नये म्हणून चैत्यभूमी व्यवस्थापन समिती, भारतीय बौद्ध महासभा यांनी राज्यातील सर्व जिल्हा शाखांना पत्र लिहिले आहे. मुंबईत न येता विभागात असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला, बुद्ध विहारात जाऊन अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चैत्यभूमी परिसर वेळोवेळी सॅनिटाइझ केला जात आहे. जे आंबेडकरी अनुयायी आज ५ डिसेंबरला येत आहेत, त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून, शरीराचे तापमान तपासून, हात सॅनिटाईझ करून गाभाऱ्यात अभिवादन करण्यासाठी सोडले जात आहे. ६ डिसेंबरला चैत्यभूमीच्या गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नसणार आहे. ७ डिसेंबरनंतर पुन्हा गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल, असे भारतीय बौद्ध महासभेचे भिकाजी कांबळे यांनी सांगितले.

ऑनलाइन अभिवादन -

चैत्यभूमीवरील अभिवादन, शासकीय सलामी आदी घडामोडी लाईव्ह स्वरूपात दुरदर्शन या सरकारी चॅनलवरून दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी युट्युबवर bit.ly/abhivadan2020yt, फेसबुकवर bit.ly/abhivadan2020fb तर ट्विटरवर bit.ly/abhivadan2020tt या लिंकवरून आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन करावे, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.

Last Updated : Dec 5, 2020, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details