महाराष्ट्र

maharashtra

नवी नियमावली : होम क्वारंटाईनमध्येही मास्क, ग्लोज घालणे बंधनकारक

By

Published : Apr 2, 2021, 12:59 AM IST

लक्षणे नसलेल्या आणि कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन केले जाते. या रुग्णांसाठी गुरूवारी पालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनाही घरात मास्क घालणे, हातात ग्लोज घालणे तसेच पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, सॅनिटाईजर ठेवणे बंधनकारक केले असून होम क्वारंटाईनची मुदत १४ दिवसांवरून १० दिवस करण्यात आली आहे.

BMC declared new Guidelines for home quarantine in mumbai
नवी नियमावली : होम क्वारंटाईनमध्येही मास्क, ग्लोज घालणे बंधनकारक

मुंबई - शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. लक्षणे नसलेल्या आणि कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन केले जाते. या रुग्णांसाठी गुरूवारी पालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनाही घरात मास्क घालणे, हातात ग्लोज घालणे तसेच पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, सॅनिटाईजर ठेवणे बंधनकारक केले असून होम क्वारंटाईनची मुदत १४ दिवसांवरून १० दिवस करण्यात आली आहे.

नियम कठोर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, आता होम क्वारंटाईन असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. आतापर्यंत लक्षणे नसलेल्या, कमी लक्षणे असलेल्या तसेच इतर आजार असलेल्या पण लक्षणे नसलेल्या ज्येष्ठांना होम क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, आता होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनाही घरातही कोरोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागणार आहेत. पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आज याबाबतचे परिपत्रक जारी केले.

...तर रुग्णालयात दाखल करणार
होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असेल, ताप वाढला असेल, जीने चढताना-उतरताना त्रास होत असेल, सतत छातीत दुखत असेल, खोकला येत असेल, मानसिक भ्रम निर्माण होत असेल, अशक्तपणा किंवा शरीरातील एखादा अवयव सुन्न पडत असेल त्याचबरोबर शरीरातील इतर अवयवांचे कार्य सुरळीत चालत नसेल तर अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश पालिकेने दिले आहेत.

१० दिवस क्वारंटाईन -
होम क्वारंटाईन दरम्यान रुग्णाला सलग तीन दिवस ताप न येणे. ७ दिवस स्वतः काळजी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरच होम क्वारंटाईनमधून मुक्तता होऊ शकते. १० दिवसांचे होम क्वारंटाईन संपल्यानंतर कोरोना आहे की, नाही, यासाठी कोणतीही वेगळी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. होम क्वारंटाईन रुग्णांची माहिती त्याचे कुटुंबीय, शेजारी, उपचार करत असलेला डॉक्टर आणि स्थानिक आरोग्य केंद्र याला असणे बंधनकारक आहे.

रुग्णांच्या घरी भेटी देणार -
होम क्वारंटाईन असलेल्या एकूण रुग्णांपैकी किमान १० टक्के रुग्णांच्या घरी वैद्यकीय पथकाकडून दररोज आळीपाळीने भेटी देऊन सर्व पडताळणी करण्यात येणार आहे. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णाला कोरोना काळजी केंद्र (सीसीसी २) मध्ये हलवावे तसेच यात सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.

गर्भवती महिलांना होम क्वारंटाईन नाही -
प्रसूतीकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना होम क्वारंटाईन लागू नाही. तर स्तनदा मातांच्याबाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व फॅमिली डॉक्टर यांच्या एकत्रित विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घेतला जाणार आहे. रुग्णांबाबतच्या दैनंदिन नोंदी वॉर्ड वॉर रुमने ठेवाव्यात तसेच संपर्क होत नसलेल्या रुग्णांची माहिती वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) किंवा पालिकेच्या आरोग्य केंद्रांना कळवली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details