महाराष्ट्र

maharashtra

License Canceled For Wrong Side Driving: सावधान! एका दिवसात 104 वाहन चालकांचे लायसेन्स रद्द; 'ही' चूक ठरली कारणीभूत

By

Published : Jul 14, 2023, 7:24 PM IST

रस्ते अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलीस वेगवेगळ्या मोहिमा आखत असतात. नियमाविरुद्ध दिशेने गाडी चालवण्याचे प्रमाण वाढले असल्याने वाहतूक पोलिसांनी याविरुद्ध कंबर कसली आहे. वाहतूक पोलिसांनी अशा पद्धतीने वाहन चालवणाऱ्या 104 वाहन चालकांचे लायसेन्स रद्द केले आहे.

License Canceled For Wrong Side Driving
'ही' चूक कारणीभूत

विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

मुंबई :वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, यंदा एप्रिल महिन्यात देखील नियमाविरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. त्यानंतर पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. एका दिवसात मुंबई शहरात 2 हजार 713 जणांविरुद्ध विरुद्ध असे वाहन चालविल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे 1 हजार 623 वाहन चालकांनी पेंडिंग असलेला दंड भरलेले आहे. तसेच एकूण 305 वाहन चालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. यापैकी 104 वाहन परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांनी दिली आहे. याशिवाय 47 वाहने देखील पोलिसांनी जप्त केली असून ही सर्व कारवाई केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी एकूण 11 लाख 57 हजार 500 रुपये इतका दंड वसूल केला आहे.

काय म्हणाले सह पोलीस आयुक्त? -विरुद्ध दिशेने दुचाकी किंवा तीनचाकी वाहने चालवणाऱ्यांवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, नियमाविरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांना स्वतःच्या जीवास तर धोका उत्पन्न होतोच. परंतु इतरांच्या जीवाला सुद्धा धोका उत्पन्न करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्या कारणास्तव आम्ही अशी गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होईल आणि त्यांची जुनी रिकवरी म्हणजेच पेंडिंग दंडदेखील वसूल केले जातील.

कोणती कारवाई होणार?विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांचे लायसन्स देखील जप्त करण्यात येईल. त्याचप्रमाणे दोन दिशांच्या वाहन मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाचे लायसन्स जप्त करून त्यांच्यावर भारतीय दंड विधान आणि मोटर वाहन कायदा याद्वारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचा मोटर वाहन परवाना प्रलंबित करण्यासाठी किंवा तो रद्द करण्यासाठी देखील आम्ही आरटीओकडे पाठवणार आहोत. आमचे वाहन चालकांना आवाहन आहे की, त्यांनी विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये. वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी ही माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details