महाराष्ट्र

maharashtra

मानधन आणि पिकविम्याच्या रकमेतून प्रवाशांसाठी केली पाण्याची सोय

By

Published : Feb 2, 2021, 3:23 PM IST

सामाजिक उपक्रम राबविण्याची इच्छा असेल तर पैसा कोणत्याही प्रकारे उभा केला जाऊ शकतो. याचे उदाहरण लातूर तालुक्यातील मुरुड येथे समोर आले आहे. मानधन आणि पीकविम्याच्या हक्काच्या पैशातून एका शिक्षकाने पिण्याच्या पाण्याची सोय करून प्रवाशांची तहान भागवली आहे.

प्रवाशांसाठी पाण्याची सोय
प्रवाशांसाठी पाण्याची सोय

लातूर - जिल्ह्यातील मुरुड हे लातूर-मुंबई महामार्गावरील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. बसस्थानकात प्रवाश्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता आहे. येथील प्रविण पाटील या शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक लाखापेक्षा जास्त पैसे खर्चून बोअरवेल घेत प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर 42 वृक्षांची लागवड केली आहे. यामुळे गावकऱ्यांसह प्रवाशी आनंद व्यक्त करत आहेत.

प्रविण पाटील

42 वृक्षांची केली लागवड-

मुरुड हे गाव लातूर मुंबई महामार्गावरील मध्यवर्ती गाव आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तर बसस्थानक परिसरात घाण व दुर्गंधीचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. हीच गरज ओळखून येथील जनता विद्यालयातील शिक्षक प्रविण पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शासनाकडून प्राप्त झालेला पीकविमा व एनसीसीच्या वार्षिक मानधनातून बसस्थानक परिसरात बोअरवेल घेऊन तिथं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सोबतच 42 वृक्षांची लागवड करून बसस्थानक परिसर सुंदर बनवला आहे. यासाठी एक लाखापेक्षा सुद्धा जास्त रक्कम खर्च केली आहे.

प्रवाश्यांसह विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय-

मुरुड गावातून मुंबई, पुणे आदी महानगराला जास्तीची वाहने जातात. प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी बिस्लरी शिवाय पर्याय नव्हता. तर इथं हजारोच्या संख्येत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. त्यांची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय व्हायची. त्यामुळे लोकोपयोगी व पर्यावरणपूरक अशा सामाजिक कार्याची आवड असलेले प्रविण पाटील यांनी हा वेगळा उपक्रम राबविला आहे. बोअरवेल घेतल्यानं प्रवाश्यांसह विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय झाली. तर बसस्थानक परिसरात 42 वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केल्याने परिसर हिरवागार व सावलीचा बनला आहे.

हेही वाचा- दिलासा! कृषी अधिभाराचा फटका नाही, पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी जैसे थे

हेही वाचा-दिल्ली पोलिसांनी चीनच्या सीमेवर जायला हवे - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details