महाराष्ट्र

maharashtra

मराठी भाषिकांचा यावर्षीही 'काळा दिन'; मराठी भाषिकांचा आवाज दडपण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न

By

Published : Nov 1, 2020, 12:29 PM IST

१ नोव्हेंबरला कर्नाटकचा स्थापना दिन असतो. या दिवशी बेळगावातील आणि इतर सीमावर्ती भागातील मराठी भाषिक काळा दिवस पाळतात. यावर्षीही सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

Black Day
काळा दिवस

कोल्हापूर - अनेक वर्षे अन्यायाविरोधात लढणार्‍या मराठी जनतेचा यावर्षीही कर्नाटक सरकारकडून आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सकाळपासून बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काळे झेंडे लावण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. मात्र, तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिकांनी काळा दिवस साजरा केला

मराठा मंदिराला पोलीस छावणीचे स्वरूप -

मराठी भाषिकांना नेहमीच कायद्याची बंधने पाळत लढा द्यावा लागतो. दरवर्षी 1 नोव्हेंबरला मराठी भाषिक काळा दिवस पाळतात. कोणतेही उग्र आंदोलन न करता सर्व निर्बंध पाळत मराठी भाषिकांनी आजपर्यंत लढा दिला आहे. दरवर्षी काळ्या फिती लावून निषेध फेरी काढण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही उग्र आंदोलन न करता हरताळ पाळत व शक्य असेल तिथेच, नियमांचे पालन करत गटागटाने, प्रार्थना, संवाद व चर्चा सत्र आयोजित करून आपला निषेध नोंदवण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीककरण समितीने केले होते. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी मराठी भाषिक निषेध व्यक्त करत आहेत. समितीच्या मराठा मंदिर परिसराला सध्या पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शिवसैनिकांना सुद्धा निषेध व्यक्त करण्यास अटकाव -

निषेध व्यक्त करण्यासाठी बेळगावमधील शिवसेना कार्यालयात काळे शर्ट परिधान करून आलेल्या शिवसैनिकांनासुद्धा पोलिसांनी विरोध केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसैनिक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

बेळगावसह ग्रामीण भागात सुद्धा निषेध -

ग्रामीण भागात व वार्डा-वार्डात, मर्यादित वेळेत, सर्व नियम पाळत निषेध व्यक्त करावा असे समितीने आवाहन केले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मराठी भाषिक आपला निषेध व्यक्त करत आहेत. शिवाय संवेदनशील भागात दैनंदिन व्यवहारात अडथळा येणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आली आहे.

चिमुकल्यांनी सुद्धा हाती घेतले काळे झेंडे -

अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी मराठी भाषिक काळे कपडे परिधानकरून व हातात काळे झेंडे घेत रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनीही कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details