महाराष्ट्र

maharashtra

किरीट सोमैय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावे; कोणीही त्यांना विरोध करू नये - हसन मुश्रीफ

By

Published : Sep 24, 2021, 7:33 PM IST

Updated : Sep 24, 2021, 8:38 PM IST

किरीट सोमैय्या हे कोल्हापुरात येण्यापूर्वी जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमैय्या यांनी जिल्ह्यातील शांतता बिघडवू नये, असे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

कोल्हापूर- भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमैय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावे. त्यांना कोल्हापुरात येऊन काय करायचे आहे, ते त्यांनी करावे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करायचा नाही. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की माझ्या आवाहनाला साथ देणार नाही, तो माझा कार्यकर्ता नाही. कोल्हापुरात येऊन जिल्ह्यातील शांतता बिघडेल, असे कोणतेही वक्तव्य किरीट सोमैय्या यांनी करू नये, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.
हेही वाचा-किरीट सोमय्यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार



सोमैय्या यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा व्यवस्थित पार पाडावा-

दोन वेगवेगळे आरोप करत किरीट सोमैय्यांनी आर्थिक घोटाळा केला असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी पुन्हा कोल्हापुरात येऊन संबंधित कारखान्यात माहिती घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी खुशाल कोल्हापुरात यावे. त्याला आमचा कोणताही विरोध असणार नाही. जी गोष्ट दहा वर्षांपूर्वी घडली, त्याचे कर्जही फेडले आहे. त्या गोष्टी आता उकरून काढत आहेत. त्याचा काहीही संबंध नाही. कोणताही आर्थिक घोटाळा झाला नाही. त्यामुळे घाबरायचे काही कारण नाही. त्यांनी माहिती घ्यावी, आमची हरकत नाही. मात्र, त्यांनीसुद्धा कोल्हापूरात येऊन कोणत्याही पद्धतीने शांतता बिघडेल अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा स्टंट करू नये, असेही मुश्रीफ यांनी आवाहन केले. कार्यकर्त्यांनीसुद्धा सबुरीने घ्यावे. त्यांना जे करायचे आहे, ते करू द्यावे.
हेही वाचा-आता न्यायालयातच निर्दोषत्व सिध्द होईल - अनिल परब

शरद पवार यांना माहिती आहे...
पुढे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, की किरीट सोमैय्या यांनी आरोप केल्यानंतर आपण स्वतः राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना याबाबत सगळी परिस्थिती सांगितली. आपले कार्यकर्ते असे करणार नाहीत, हे त्यांनाही माहित नाही. सोमैय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावे. त्यांना कोणत्याही पद्धतीने विरोध करू नये, असे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी बोलले होते. त्यानुसार आपण आज कार्यकर्त्यांना आवाहन केल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले.
हेही वाचा-हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरला जाताना अडवून दाखवावे- किरीट सोमैय्या

किरीट सोमैय्या 28 सप्टेंबरला कोल्हापुरला पुन्हा येणार-

कोल्हापूरच्या सीमेवरून 20 सप्टेंबरला भाजप नेते किरीट सोमैय्या यांना पुन्हा मुंबईला जावे लागले होते. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मध्यस्थी करत कोल्हापूरला येऊ नये, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन किरीट सोमैय्या पुन्हा मुंबईला गेले होते. मात्र, त्यांनी पुन्हा कोल्हापूरला येणार असल्याचे जाहीर केले होते. अंबाबाईचे दर्शन 28 सप्टेंबरला घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याबाबत कारखाना स्थळी जाऊन माहिती घेणार असल्याचे किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे. हिंमत असेल तर या सरकारने कोल्हापूरला जाताना अडवून दाखवा, असे आव्हान किरीट सोमैय्या यांनी दिले होते.

Last Updated :Sep 24, 2021, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details