कोल्हापूर : एकेकाळी जिल्ह्यात हजाराच्या घरात गुऱ्हाळघरे पाहायला मिळायची. मात्र, उत्पादन खर्च आणि मिळणारा दर समाधानकारक नसल्याने अनेक गुऱ्हाळघरे आता बंद होत चालली आहेत. तर अनेक जण या व्यवसायात काहीही राहीले नाही, म्हणत वर्षांनुवर्षे चालत आलेला व्यवसाय बंद करायच्या विचारात आहेत. पण, असे विचार करणाऱ्या सर्वच चालकांसाठी कोल्हापूरातील एका गुऱ्हाळघर चालकाने तंत्र विकसित केले आहे. ज्याने त्यांच्या या पारंपरिक व्यवसायाला एक वेगळी दिशा तर मिळेलच शिवाय दुप्पट नफा कसा मिळू शकतो याचे उदाहरण दाखवून दिले आहे. कोण आहेत हे गुऱ्हाळघर मालक आणि त्यांनी असे काय केले आहे. ज्यामुळे त्यांच्या गुळाला 40 रुपये किलोवरून तब्बल 200 रुपये किलो इतका दर मिळणार ( Jaggery Chocolate Kolhapur ) आहे.
पारंपरिक गुळाच्या ढेप न बनवता बनवल्या 'चॉकलेट कँडी'
कोल्हापूरातल्या करवीर तालुक्यातील शिंदेवाडी या छोट्याशा गावात राहणारे शेतकरी राजेंद्र वडगावकर हे आपल्या वडीलांच्या काळापासूनच सुरू असलेले गुऱ्हाळघर चालवतात. ते स्वतः या व्यवसायात 15 ते 20 वर्षांपासून आहेत. यामध्ये त्यांना म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या बंधूने मिळून आपला पारंपरिक व्यवसाय बंद करण्याचा विचार न करता या व्यवसायात काहीतरी वेगळं करून उत्पन्न दुप्पट करण्याबाबत काम सुरु केले. याचदरम्यान लहान मुलांसाठी सेंद्रिय गुळापासून बनवलेले चॉकलेट देऊ शकतो असा विचार त्यांच्या डोक्यात आला. तब्बल 2 वर्षांपासून त्यांनी यामध्ये विविध प्रयोग सुरू ठेवले होते. त्यानुसार त्यांनी अस्सल कोल्हापुरी सेंद्रिय गुळापासून चॉकलेट बनवले. या चॉकलेटला त्यांनी 'जॅगफायटर' असे नाव दिले आहे. त्यांच्या या चॉकलेट मुळे त्यांचे उत्पन्न तर दुप्पट झालेच आहे, शिवाय मागणी सुद्धा वाढली आहे. ज्यामुळे गूळ उत्पादन व्यवसाय बंद करण्याचा विचार तर लांबच शिवाय आता अधिक उत्पादन घेण्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करत आहेत.
40 रुपये किलोला 200 रुपये इतका दर कसा मिळाला?
दरम्यान, त्यांनी बनवलेल्या या चॉकलेटचे वजन 7 ग्रॅम इतके आहे. त्याची ग्राहकांसाठी त्यांनी दोन रुपये इतकी किंमत ठरवली आहे. त्यानुसार त्यांनी 100 चॉकलेट नगासाठी प्लॅस्टिक बरण्या बनवून घेतल्या असून, त्याची किंमत जवळपास 130 च्या आसपास ठेवली आहे. त्यामुळे 1 किलो गुळाला बाजारात 40 रुपये किलो इतका दर मिळतो. मात्र, या चॉकलेटच्या रुपात विक्री केल्याने त्याच गुळाला 200 रुपये किलो इतका दर मिळाला आहे.