महाराष्ट्र

maharashtra

मराठा आरक्षण आंदोलन; अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी, पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस केले जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 9:00 AM IST

Updated : Nov 25, 2023, 10:38 AM IST

Maratha Reservation Protest : अंतरवाली सराटीच्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केलीय. त्याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशानं दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऋषीकेष बेदरेकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

Antarwali Sarathi Lathicharge
संग्रहित छायाचित्र

जालना Maratha Reservation Protest : जालन्यातील अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांच्या उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केलीय. मुख्य आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहेत. अंतरवाली सराटीच्या राड्यानंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशानं दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह पोलिसांना आढळून आलाय. पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषीकेश बेद्रेला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

तीन आरोपींना अटक : अंतरवली सराटीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या राड्यानंतर दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. यातील एका आरोपीकडं पोलिसांना गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसं आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस ऋषिकेश बेदरेची कसून चौकशी करत आहेत.

लाठीचार्जचे राज्यभर उमटले पडसाद : जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी कायदा सुव्यस्था राखण्याच्या आणि उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असल्याच्या दृष्टीनं, उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती. यादरम्यान तीन वेळा पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास उपोषणाच्या व्यासपीठासमोर बसलेले आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आले. यामुळं एकच गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचं सांगितलं. यानंतर संतप्त गावकरी आणि आंदोलकांनी दगडफेक सुरु केली. या घटनेत शेकडो आंदोलक आणि अनेक पोलीस जखमी झाले होते. याचे परिणाम संपुर्ण राज्यात उमटले होते. त्याच रात्री राज्यातील अनेक भागात जाळपोळ झाली होती. यानंतर आंदोलन अधिक तीव्र झालं होतं.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणात लाठीचार्जपासून मुख्यमंत्र्यांची भेट, वाचा १७ दिवसात झालं तरी काय....
  2. Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली
Last Updated : Nov 25, 2023, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details