महाराष्ट्र

maharashtra

जळगावात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत, ३०६ शाळांची खणाणली घंटा

By

Published : Jul 15, 2021, 8:15 PM IST

Updated : Jul 15, 2021, 10:12 PM IST

राज्य शासनाने १५ जुलैपासून राज्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील ३०६ माध्यमिक शाळांची घंटा आज वाजली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी झाली. त्यानंतर गुलाबपुष्प देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

जळगाव -कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने राज्य शासनाने १५ जुलैपासून राज्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील ३०६ माध्यमिक शाळांची घंटा आज वाजली. कोरोनानंतर सुमारे दीड वर्षांनी शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी झाली. त्यानंतर गुलाबपुष्प देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

जळगावात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत

जळगाव जिल्ह्यातील ७०८ माध्यमिक शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. पण, ३०६ शाळांबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव पाठवले. त्यामुळे निम्मेच शाळा उघडल्या आहेत. ठराव नसलेल्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम आहे. या शाळा उघडतील की नाही, याबाबत विद्यार्थी व पालकवर्गात संभ्रमावस्थेत आहेत.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद

कोरोनामुळे तब्बल दीड वर्षे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय फारसा प्रभावी ठरला नाही. याशिवाय अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते पाल्यासाठी अँड्रॉईड मोबाईल घेऊ शकत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. आता मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थी मित्रमंडळीसोबत शाळेत दाखल झाले. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात शिकवताना खूप समाधान असल्याचे चित्र दिसले.

प्रत्येक विद्यार्थ्याची स्क्रिनिंग, मगच शाळेत प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करताना कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाहणी केली असता, त्याठिकाणी समाधानकारक चित्र दिसले. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याची स्क्रिनिंग (हँड सॅनिटायझेशन, तापमान मोजणी) करून आत सोडले जात होते. मास्क नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. गुलाबपुष्प देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतराने म्हणजेच एका बेंचवर एकच विद्यार्थी अशा प्रकारे बसवण्यात आले. त्यानंतर अध्यापनाला सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी १०० टक्के उपस्थिती

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. यावरून शाळा उघडण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे मित्रमंडळीला भेटता आले नव्हते. ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. आता मात्र, शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने खूप आनंद आहे. शिक्षकांना आणि मित्रमंडळीला भेटून आनंद होत आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.

हेही वाचा -डॉलर वधारल्याने सोन्याला पुन्हा झळाळी; प्रतितोळ्याचे दर 50 हजारांच्या उंबरठ्यावर

Last Updated :Jul 15, 2021, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details