महाराष्ट्र

maharashtra

जळगावात ठिकठिकाणी प्लास्टिक पतंगांची विक्री, प्रदुषण वाढण्याची भीती

By

Published : Jan 13, 2021, 5:29 PM IST

Updated : Jan 13, 2021, 5:34 PM IST

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध स्वरूपाचे रंगीबेरंगी पतंग विक्रीस आले आहेत. पाच रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पतंगाच्या किंमती असून कार्टून्सची चित्रे असलेली पतंगे लहान मुलांना आकर्षित करत असल्याचे चित्र जळगावमध्ये दिसत आहे.

पतंग
पतंग

जळगाव -मकरसंक्रांतीचा सण अवघ्या समोर येऊन ठेपला आहे. आकाशातील पतंगबाजी म्हणजे या सणाचे प्रमुख आकर्षण असते. मकरसंक्रांतीसाठी आकर्षक रंगसंगतीचे, विविध आकाराचे पतंग तसेच मांजा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पण, बहुतांश विक्रेत्यांकडे प्लास्टिकपासून बनवलेले पतंग असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होण्याची भीती आहे. दुसरीकडे, नायलॉन मांजावर बंदी असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे सुदैवाने जळगावात नायलॉन मांजाची विक्रीला आळा बसला आहे.

बोलताना विक्रेते

कार्टून्सवाले पतंग घालताहेत बच्चे कंपनीला भुरळ

मकरसंक्रांतीच्या सणासाठी जळगावातील बाजारपेठेत आकर्षक असे पतंग विक्रीसाठी आले आहेत. लहान-मोठ्या आकाराचे, रंगीबेरंगी पतंग खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. डोरोमॉन, छोटा भीम, पोकेमॉन, स्पायडरमॅन असे विविध कार्टून्सचे पतंग बच्चेकंपनीला भुरळ घालत आहेत. तितली, मछली प्रकारातील पतंगांनाही बच्चेकंपनीची मागणी असल्याचे पतंग विक्रेते सचिन वाणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

5 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे पतंगांचे दर

बाजारपेठेत 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे विविध आकर्षक पतंग उपलब्ध आहेत. कोरोनाचा काळ असला तरी आता नागरिक खरेदीबाहेर हळूहळू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पतंगांच्या खरेदीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचेही विक्रेते सचिन वाणी यांनी सांगितले. बहुसंख्य विक्रेत्यांनी सुरत, अहमदाबाद येथून माल विक्रीसाठी आणला आहे. कोरोनामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पतंगाच्या नेहमीच्याच व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिक पतंगांची सर्रासपणे विक्री

प्लास्टिकवर बंदी असताना बाजारात प्लास्टिक पतंगांची सर्रासपणे विक्री सुरू आहे. त्याकडे महापालिका व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. काही विक्रेत्यांनी मात्र, प्लास्टिक सोबतच कागदी आणि कापडी पतंगही विक्रीला आणले आहेत. पतंग खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाला ते आवर्जून कागदी किंवा कापडी पतंग घेण्याचा आग्रह करत असल्याचे चित्र शहरातील बळीराम पेठेत नजरेस पडले. दरम्यान, शहरात प्लास्टिक पतंग सर्रासपणे विकले जात असल्याबाबत महापालिकेचे आरोग्य उपायुक्त पवन पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी महापालिका प्रशासनाकडून प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई सातत्याने केली जात आहे. प्लास्टिकचे पतंग कोणी विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

नायलॉन मांजाऐवजी सुती मांजाची विक्री

नायलॉन मांजा हा पक्ष्यांसह मानवासाठीही घातक असल्याने त्याच्या विक्रीवर कायद्याने बंदी आहे. अशा परिस्थितीतही नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने जळगावात नायलॉन मांजाऐवजी सुती मांजाची विक्री केली जात आहे. पोलीस प्रशासनाने मध्यंतरी कारवाईची मोहीम राबवून दीड लाख रुपये किंमतीचा नायलॉन मांजाचा साठा जप्त केला होता.

हेही वाचा -दीपनगरात साकारत आहे ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प

हेही वाचा -महामार्गाच्या कामास गती द्या - जिल्हाधिकारी राऊत

Last Updated :Jan 13, 2021, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details