महाराष्ट्र

maharashtra

जळगाव जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; नद्या, नाल्यांना पूर... पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 7, 2021, 4:39 PM IST

Updated : Sep 7, 2021, 5:04 PM IST

heavy rain in all over jalgaon district

जिल्ह्यातील तापी, गिरणा, पूर्णा, बोरी, वाघूर, तितूर, डोंगरी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार पाऊस पडत असल्याने तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. पूर्णा नदीची पाणी पातळी देखील सातत्याने वाढत असल्याने सायंकाळपर्यंत तापीच्या पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. बोरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने बोरी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.

जळगाव -जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्या व नाल्यांना पूर आले असून, काही गावांमध्ये पाणी घुसले आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले होते. चाळीसगाव तालुक्यात तर पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही पूरपरिस्थिती ओसरत नाही तोच आठवडाभरात पुन्हा एकदा याठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

नदी नाल्यांना पूर आल्याची दृश्ये

तापी, गिरणा, बोरी नद्या दुथडी -

जिल्ह्यातील तापी, गिरणा, पूर्णा, बोरी, वाघूर, तितूर, डोंगरी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार पाऊस पडत असल्याने तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. पूर्णा नदीची पाणी पातळी देखील सातत्याने वाढत असल्याने सायंकाळपर्यंत तापीच्या पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. बोरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने बोरी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील सात्री गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस -

जामनेर तालुक्यातील काही गावांमध्येही पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली आहेत. जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उंबर नदीला पूर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे भागदरा गावामधील अनेक घरांवरील पत्रे उडाली असून, उंबर नदीचे पाणी भागदरा गावात शिरले आहे. गावाजवळ असलेला तलाव देखील फुटल्याने गावात पाणीच पाणी झाले आहे. रस्ते देखील वाहून गेले असून शेतांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला, उपचाराअभावी चिमुकल्या आरुषीचा जीव गेला

चाळीसगाव तालुक्यात पुन्हा पूरपरिस्थिती -

गेल्या आठवड्यात चाळीसगाव शहरासह तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. आता पुन्हा मुसळधार पाऊस पडत असल्याने डोंगरी आणि तितूर नद्या ओसंडून वाहत असून, पाऊस असाच सुरू राहिला तर पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मेहुणबारे, खडकी सिम, वरखेडे भागातील शेतांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. काल रात्री मुसळधार पावसामुळे मेहुणबारे-खडकी सिम गावांमधील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. तितूर नदीला पुन्हा पूर आल्याने चाळीसगाव शहरातील नदी काठच्या भागात पाणी साचले आहे. घाट रोड, बामोशी बाबा दर्गा परिसर पाण्याखाली गेला आहे.

हतनूर धरणातून 27 हजार 828 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू -

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात मुसळधार पाऊस सुरु असून, धरणातील पाण्याची आवक सतत वाढत आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे, जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळवले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. सध्या धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून, यातून 27 हजार 828 क्युसेक तर कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. पूर्णा नदीचे पूर पाणी सायंकाळपर्यंत हतनूर धरणात पोहोचण्याची शक्यता असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार आहे. तापी नदीकाठावरील गावातील सर्व नागरिकांनी सावध रहावे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये, आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. तसेच नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.

Last Updated :Sep 7, 2021, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details