महाराष्ट्र

maharashtra

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटलांवर गोळीबार, 4 राऊंड फायर

By

Published : Jul 26, 2021, 10:05 AM IST

शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात 4 ते 5 संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kulbhushan Patil
Kulbhushan Patil

जळगाव -शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी (25 जुलै) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी कुलभूषण पाटील यांचा कारने पाठलाग केला. यावेळी 1, तर त्यांच्या पिंप्राळा परिसरातील घराजवळ 3 असे 4 राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील बचावले आहेत. क्रिकेट खेळताना दोन गटात झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून उपमहापौर पाटील यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात 4 ते 5 संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटलांवर गोळीबार

काय आहे नेमका प्रकार?

जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गट परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा या वादात मध्यस्थी करण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील हे गेले होते. त्यांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांनी एकाच गटाची बाजू घेतल्याचा आरोप करून त्यांना काही तरुणांनी शिवीगाळ केली. या प्रकारानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास कुलभूषण पाटील हे त्यांचे सहकारी अनिल यादव यांच्यासह आपल्या संपर्क कार्यालयातून घरी दुचाकीने जात होते. तेव्हा कारने त्यांचा पाठलाग करत तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाटील यांनी घराच्या दिशेने दुचाकी पळवली. त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्यावर हल्लेखोरांनी पुन्हा 3 राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

पोलिसांची घटनास्थळी धाव -

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा जबाब नोंदवून घेतला. दरम्यान, आपल्यावर गोळीबार करणाऱ्यांमध्ये मंगलसिंग राजपूत, उमेश राजपूत, महेंद्र राजपूत, जुगल व बिऱ्हाडे या तरुणासह अन्य 2 ते 3 जण असल्याचा आरोप कुलभूषण पाटील यांनी केला. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

घटनास्थळी मिळाले एक काडतूस -

पोलिसांना घटनास्थळी एक काडतूस मिळाले आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहेत. त्यात हल्लेखोर कैद झाले आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.

हेही वाचा -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details