महाराष्ट्र

maharashtra

निर्बंध असताना धामधुमीत लग्न करणाऱ्या वधू-वर पित्यांना 50 हजारांचा दंड

By

Published : Apr 24, 2021, 2:03 PM IST

जिल्हा प्रशासनाकडून लग्नसोहळ्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. असे असताना देखील शहरात नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एका लग्न सोहळ्यात 100 हून अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने, वधूवर पित्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लग्नात मर्यादेपेक्षा जास्त लोक
लग्नात मर्यादेपेक्षा जास्त लोक

जळगाव -शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, जिल्हा प्रशासनाकडून लग्नसोहळ्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील शहरात नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील योगेश्वरनगरात एका लग्न सोहळ्यात 100 हून अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने महापालिका उपायुक्तांच्या पथकाने वधूवर पित्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्बंध असताना धामधुमीत लग्न करणाऱ्या वधू-वर पित्यांना 50 हजारांचा दंड

100 पेक्षा अधिक वऱ्हाडी

शहरातील योगेश्वरनगरात एका लग्नसमारंभात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक लग्नसमारंभ असलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग दिसून आले नाही. विशेष म्हणजे लग्नाला आता केवळ 25 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असताना तेथे 100 पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आले. काहींच्या तोंडावर मास्क नव्हते. सॅनिटायझेशनची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे उपायुक्तांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हजारांचा दंड केला.

समाजभान जपण्याची गरज

'सध्या जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत नागरिकांचे बेफिकीर वर्तन सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाचा अटकाव होईल तरी कसा'? असे मत उपायुक्त संतोष वाहुळे यांनी व्यक्त केले.

'ईटीव्ही भारत'ची भूमिका

सध्याचा काळ सर्वांसाठी संक्रमणासारखाच आहे. आपल्या लहान-लहान चुकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा नियमित वापर आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री प्रत्येकाने पाळायला हवी. गरज असेल तरच घराबाहेर पडा, सार्वजनिक कार्यक्रम टाळा, लग्नसमारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि मर्यादित वेळेत आटोपा, असे आवाहन 'ईटीव्ही भारत' करत आहे. नियमावली पाळली तरच आपण कोरोनाला रोखू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

हेही वाचा -नूथलपती वेंकट रमणा भारताचे नवे सर न्यायाधीश

ABOUT THE AUTHOR

...view details