महाराष्ट्र

maharashtra

जळगावात टाळेबंदी वाढला सायबर गुन्ह्यांचा आलेख; फसवणुकीच्या दीडशे तक्रारी

By

Published : Jun 5, 2021, 9:13 PM IST

Updated : Jun 5, 2021, 10:16 PM IST

जळगाव जिल्ह्यात टाळेबंदी व निर्बंधाच्या काळात सायबर गुन्ह्यांचा आलेख मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप, अकाउंट हॅकिंग, समाज माध्यमावर फेक अकाउंट तयार करून पैशांची मागणी करणे, आर्थिक फसवणूक, अशा स्वरुपाच्या सुमारे दीडशे तक्रारी जळगाव पोलीस दलाच्या सायबर सेल विभागाकडे दीड वर्षांत दाखल झाल्या आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

जळगाव -जिल्ह्यात टाळेबंदी व निर्बंधाच्या काळात सायबर गुन्ह्यांचा आलेख मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप, अकाउंट हॅकिंग, समाज माध्यमावर फेक अकाउंट तयार करून पैशांची मागणी करणे, आर्थिक फसवणूक, अशा स्वरुपाच्या सुमारे दीडशे तक्रारी जळगाव पोलीस दलाच्या सायबर सेल विभागाकडे दीड वर्षांत दाखल झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक प्रकरणात फसवणूक झालेले नागरिक बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्यासाठी समोर येत नसल्याने अशा गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बोलताना अपर पोलीस अधीक्षक

टाळेबंदीच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ठगांनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सोशल मीडियावर महिलांच्या नावे फेक प्रोफाइल बनवून, शारीरिक लोभाचे आमिष दाखवून, अश्लिल व्हिडिओ तयार करून नागरिकांना पैशांसाठी ब्लॅकमेल केले जात आहे. एवढेच नाही तर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच उद्योजक मंडळींच्या नावे फेक अकाउंट तयार करून फ्रेंड लिस्टमधल्या मित्रांकडून पैसे उकळले जात आहेत. असे गुन्हे करणाऱ्यांमध्ये महिला व तरुणींचे प्रमाणही मोठे आहे. गेल्या दीड वर्षात जळगाव पोलीस दलाच्या सायबर सेल विभागाकडे अशा स्वरुपाच्या सुमारे दीडशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात 2020 मध्ये सर्वाधिक 119 तर 2021 मध्ये आतापर्यंत 23 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या हाती स्मार्ट फोन आला आहे. त्यामुळे फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सए‌ॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. हीच बाब ओळखून आता सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडवण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढवत आहेत. नागरिकांना फसवण्यासाठी फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सए‌ॅप, इन्स्टाग्रामचा सर्वाधिक वापर केला जात आहे. त्यामुळे या नेटवर्किंग साईट्सचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असल्याचे आवाहन 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे किंवा ज्यांना ब्लॅकमेल केले जात आहे, त्यांनी सायबर सेलकडे विना संकोच तक्रार करायला हवी. यामुळे गुन्हेगारांना पकडणे शक्य होईल, असेही चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.

हनीट्रॅपचे प्रकार वाढले

अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅपचे प्रकार वाढले आहेत. फेसबूक किंवा व्हॉट्सए‌ॅपवर एखाद्या महिलेच्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. नंतर चॅटिंग करून जाळ्यात अडकवले जाते. पुढे अश्लिल चॅटिंग किंवा व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडले जाते. शेवटी अश्लिल चॅटिंग किंवा व्हिडिओचे स्क्रिन शॉट संबंधित व्यक्तीला पाठवून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर ते व्हिडिओ, चॅटिंगचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारे फसवणूक करण्याची गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताबाईंचा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा साध्या पद्धतीने साजरा

Last Updated :Jun 5, 2021, 10:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details