महाराष्ट्र

maharashtra

कोरोनामुळे वराडसीम येथील पोळा सणाची साडेचारशे वर्षांची परंपरा खंडित

By

Published : Aug 18, 2020, 2:44 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा कोणत्याही मिरवणुकीविना घरीच साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे वराडसीमला पोळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

वराडसीम येथील पोळा सण
वराडसीम येथील पोळा सण

जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराडसीम या गावी दरवर्षी बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वराडसीम येथील पोळा सणाला साडेचारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. परंतु, यावर्षी सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करण्यास मनाई आहे. त्यामुळे वराडसीम येथील पोळा सण साजरा करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा पहिल्यांदा खंडित झाली आहे.

वराडसीम येथील पोळा सणाचा उत्सव

वराडसीम या गावात दरवर्षी पोळ्याचा सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी सायंकाळी गावाच्या मुख्य दरवाजाच्या छोट्याशा खिडकीतून पहिली मानाची बैलजोडी निघते. त्यानंतर पोळा फुटला असे जाहीर केले जाते. त्यानंतर गावातील सर्व शेतकऱ्यांच्या सजवलेल्या बैलजोड्यांची एकत्र वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत आबालवृद्ध मोठ्या आनंदाने सहभागी होऊन वाद्यांच्या तालावर ठेका धरतात. वराडसीमच्या पंचक्रोशीतून हजारो लोक हा क्षण 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी याठिकाणी येत असतात. मिरवणुकीनंतर घरोघरी बैलांचे पूजन केले जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो.

हेही वाचा -शिक्षण हक्क कायद्याची शाळांकडून पायमल्ली; बेसुमार शुल्कवसुली, तर 81 हजाराहून अधिक प्रवेश नाकारले

वराडसीम गावात पोळा सण हा दिवाळीपेक्षाही आनंदात साजरा होतो. गावातील सासुरवाशीण मुली पोळ्याच्या सणाला माहेरी येतात. या दिवशी घरातील सूनबईंच्या हस्ते बैलजोडीचे मनोभावे पूजन केले जाते. परंतु, यावर्षी सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने वराडसीम येथे साजरा होणाऱ्या पोळा सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा कोणत्याही मिरवणुकीविना घरीच साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे वराडसीमला पोळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. ग्रामस्थांनी पोळा सण साध्या पद्धतीने साजरा करावा म्हणून पोळ्याच्या दिवशी सकाळी शांतता समितीची बैठक झाली. त्यात एकमताने पोळा सण घरीच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, वराडसीम गावाच्या इतिहासात पहिल्यांदा पोळा अशा पद्धतीने साजरा होत आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा कोरोनामुळे खंडित झाल्याचे दुःख असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : मेळघाटाला लागलेला कुपोषणाचा बट्टा 28 वर्ष उलटूनही कायमच..!

ABOUT THE AUTHOR

...view details