महाराष्ट्र

maharashtra

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट, सोयाबीनला केवळ 1800 रुपयांचा दर

By

Published : Oct 23, 2020, 5:59 PM IST

कृषी उत्पन्न बाजर समितीकडून शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कनेरगाव नाका येथील उपकृषी उत्पन्न बाजार समितीत हा प्रकार सुरू आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

farmer news
कृषी उत्पन्न बाजर समिती, कनेरगाव नाका

हिंगोली -यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आता भरीसभर म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कनेरगाव नाका येथील उपकृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव दिला जात आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

भारत पठाडे (रा. कनेरगाव नाका) असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पठाडे यांनी उपकृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या कनक ट्रेडिंग कंपनीमध्ये आपले सोयाबीन विकले. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदीचा दर प्रति क्विंटल 2 हजार 800 ठरला असतानाही त्यांना केवळ 1 हजार 800 रुपये प्रतिक्विटलनेच पैसे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी याबाबत संबंधित व्यापाऱ्याकडे चौकशी केली, मात्र व्यापारी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तर, दुसरीकडे संबधित व्यापारी गोपाल बंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हे सोयाबीन हे खराब असल्याने खरेदी योग्य नव्हते. तरीदेखील शेतकऱ्याला परत न पाठवता आम्ही सोयाबीन खरेदी केले. सोयाबीन खरेदी केल्यानंतर आम्ही ते सर्व एकत्र करत असतो. त्यामुळे खरेदी केलेले सोयाबीन हे शेतकऱ्याला परत कसे करावे? हा प्रश्न होता. त्यामुळेच मी सोयाबीन परत देण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करून देखील, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यावर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details