महाराष्ट्र

maharashtra

खोब्रामेंढा जंगलात पोलीस-नक्षल चकमक; एक नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज

By

Published : Mar 28, 2021, 4:26 PM IST

पोलीस उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात शनिवारी (दि. 28 मार्च) पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.

gadchiroli
जप्त साहित्य

गडचिरोली - पोलीस उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात शनिवारी (दि. 28 मार्च) पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले असून एक नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याचा अंदाज पोलीस विभागाने वर्तवला आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक

खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. तेव्हा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या 60 ते 70 नक्षलवादयांनी सी-60 जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे 60 ते 70 मिनीटे चाललेल्या चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले.

मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. त्यावरुन चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळी एक 303 रायफल मॅग्झीन काडतुसासह, नक्षल पिट्टू, 3न ग प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब, तसेच मोठ्या प्रमाणात औषधी साठा व नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मिळून आलेल्या 3 नग प्रेशर कुकर बॉम्ब हे बिडीडीएस पथकाच्या साहायाने घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. सी-60 कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतूक केले आहे.

हेही वाचा -गडचिरोलीत भीषण अपघातात २ जण ठार; १० जण गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details