महाराष्ट्र

maharashtra

ग्रामपंचायती 362 अन् उमेदवारांची संख्या तीन हजार; शंभराहून अधिक बिनविरोध

By

Published : Jan 5, 2021, 3:41 PM IST

Updated : Jan 5, 2021, 6:29 PM IST

गडचिरोली जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 361 ग्रामपंचायतीच्या 1 हजार 554 जागांसाठी जवळपास 3 हजार उमेदवार रिंगणात उभे आहेत. विशेष म्हणजे शंभरहून अधिक उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

गर्दी
गर्दी

गडचिरोली - जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 जानेवारी तर दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला मतदान होणार आहे. नामांकन दाखल करणे तसेच उमेदवारी मागे घेण्याची तारीख गेली असून 1 हजार 554 जागांसाठी जवळपास 3 हजार उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या सोमवारी (दि. 4 जाने.) शेवटच्या दिवशी जवळपास अडीचशेहून अधिक उमेदवारांनी माघार घेतली. तरीही तीन हजार उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे शंभरहून अधिक उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

उमेदवार व कार्यकर्त्यांची लगबग

दोन टप्प्यात होणार मतदान

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला मतदान होईल. तर चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 20 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन्ही टप्प्याची मतमोजणी 22 जानेवारीला होणार आहे.

तीन हजार मतदार पहिल्यांदाच करणार मतदान

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस 3 हजार 800 नवीन मतदार वाढले आहेत. त्यापैकी तीन हजार मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 361 ग्रामपंचायतीसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 5 लाख 42 हजार 37 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच काही ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, कोरोना संकट वाढत गेल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यादरम्यान आणखी काही ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीची संख्या वाढली आहे.

संवेदनशील भागात नामांकनच नाही

जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलीदृष्ट्या संवेदनशील भागातील काही ग्रामपंचायतीमध्ये एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केले नाही. यामध्ये धानोरा तालुक्यातील कूलभटी, कतेझरी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ही गावे नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील आहेत. या शिवाय कोरची तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये नामांकन दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. यावरुन दुर्गम भागांमध्ये नक्षलवाद्यांची दहशत कायम असल्याचे दिसून येते.

धानोरा तालुक्यात 12 तर गडचिरोली तालुक्यातील 3 ग्रामपंचायती बिनविरोध

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी बिनविरोध निवड होणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचा विकास निधी देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार गडचिरोली मतदारसंघातील धानोरा तालुक्यातील दराची, देवसूर, गिरोला, रेखाटला, कुतेगाव, कोंदावाही, सावंगा, निमगाव, मोहगाव, चिंचोली, कामनगड तर गडचिरोली तालुक्यातील मारदा, हिरापूर, मरेगाव या तीन ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य बिनविरोध निवडले जाणार आहेत.

हेही वाचा -पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी एकनाथ शिंदे यांनी दिली ई-शपथ

हेही वाचा -राज्यात सर्वाधिक वनक्षेत गडचिरोलीत असूनही प्रकल्प व पर्यायी वनीकरण नाही

Last Updated : Jan 5, 2021, 6:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details