महाराष्ट्र

maharashtra

गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांची निवड

By

Published : Mar 23, 2021, 10:12 PM IST

गडचिरोलीतील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करत असलेले डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dr. Rajendra Kumar Sharma
डॉ. राजेंद्रकुमार शर्मा

गडचिरोली - येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करत असलेले डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

फ्रांस व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण

डॉ. राजेंद्र कुमार शर्मा (जन्म 20 नोव्हेंबर, 1958) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रान्स व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन 2002 पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. 1 जानेवारी. 2019 रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा 32 वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 32 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे.

निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ सोशल अ‌ॅण्ड इकोनोमिक चेंज, बंगळुरु येथील संचालक डॉ. एस. माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

रामटेक विद्यापीठाच्या कुलगुरूकडे होता पदभार

7 सप्टेंबर, 2020 रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

हेही वाचा -22 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

ABOUT THE AUTHOR

...view details