महाराष्ट्र

maharashtra

Gadchiroli: गडचिरोलीचा विकास करण्यास आम्ही कटीबद्ध -एकनाथ शिंदे

By

Published : Oct 25, 2022, 8:28 PM IST

गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षलिंविरोधात काम करत असतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते आज मंगळवार (दि. 25 ऑक्टोबर)रोजी भामरागड येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

भामरागड येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भामरागड येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भामरागड (गडचिरोली) - धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झाले आहे. यावेळी जनजागरण मेळाव्या प्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

भामरागड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात विकास होत असून रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे असही ते म्हणाले आहेत.

गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात अमुलाग्र बदल झालेला आहे असही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी मुख्यमंत्र्यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला ही संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो, माळी गुमा मासा, शांती कुतु मज्जू, चैते चैतू पल्लो यांना साडीवाटप, राजे चैतु पुंगाटी, जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटप, रेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन, परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर बबलू देवाजी सिडाम, सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विनीत पद्मावार यांनी तर आभार पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी मानले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details